पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २७ :
पुणे परिमंडलातील सर्व प्रकारच्या (व्यावसायिक आणि घरगुती) 7 लाख 8 हजार 892 वीज ग्राहकांकडे 204 कोटी 67 लाख रुपयांची थकबाकी आहे. वारंवार आवाहन करूनही थकीत वीजबिल न भरणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरण (महाराष्ट्र राज्य विद्युत विकास महामंडळ लिमिटेड) ने सुरू केली आहे. गेल्या पंधरवड्यात पुणे परिमंडलातील 14 हजार 155 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा सुलभ करण्यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे शनिवार (29 जुलै) आणि रविवारी (30 जुलै) कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. यासोबतच कमी व्होल्टेज वीज ग्राहकांना त्यांच्या www.mahadiscom.in या वेबसाइटवर आणि एमएसईडीसीएलच्या मोबाइल अॅपवर ‘ऑनलाइन’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुण्यातील 3 लाख 14 हजार 920 वीज ग्राहकांकडे सध्या 76 कोटी 11 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी 2 लाख 68 हजार 122 घरगुती ग्राहक आहेत. त्यांच्याकडे 53 कोटी 91 लाख रुपये, 43 हजार 638 व्यावसायिक ग्राहकांकडे 20 कोटी 9 लाख रुपये, 3 हजार 160 औद्योगिक ग्राहकांकडे 2 कोटी 12 लाख रुपये थकबाकी असून, 8 हजार 914 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण 1 लाख 51 हजार 409 वीज ग्राहकांकडे 54 कोटी 29 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये 1 लाख 25 हजार 869 घरगुती ग्राहकांकडे 31 कोटी 63 लाख रुपयांची थकबाकी आहे. व्यावसायिक 21 हजार 35 ग्राहकांकडे 13 कोटी 4 लाख रुपये थकबाकी आहे. 4 हजार 505 औद्योगिक ग्राहकांकडे 9 कोटी 61 लाख रुपयांची थकबाकी असून, 952 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली या तालुक्यातील एकूण 2 लाख 42 हजार 563 वीज ग्राहकांकडे 74 कोटी 27 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये 2 लाख 16 हजार 261 ग्राहकांकडे 52 कोटी 57 लाख रुपये, व्यावसायिक 22 हजार 596 ग्राहकांकडे 14 कोटी 35 लाख रुपये, औद्योगिक 3 हजार 706 ग्राहकांकडे 7 कोटी 35 लाख रुपये थकबाकी आहे. दरम्यान, 4 हजार 289 थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.












