पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २३ : एकेकाळचे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांचे पाच वर्षाच्या शिक्षेनंतर अखेर जामीनावर सुटका झाली आहे. नऊ हजार गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती.
आता त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली असून त्यांनी आठशे कोटींची फसवणूक केलेल्या रकमेचे परतावे कोण करणार याचे उत्तर अजून तरी कोणाकडे नाही. या फसवणूक प्रकरणी त्यांच्या कुटुंबातील त्यांची पत्नी, मुलगा, मेहुणे अन् जावयाला देखील अटक करण्यात आली होती. पण नेमून दिलेल्या काळापेक्षा जास्त काळ तुरुंगात काढल्याने त्या सर्वांची जामिनावर सुटका करण्यात आली.
पुण्यातील त्यांच्या अनेक प्रकल्पामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी गुंतवणूक केली पण ते काम अपूर्ण ठेवत आपण दिवाळखोर झाल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांनी काही बँकांकडून देखील बाराशे कोटी रुपये घेतले होते.
याप्रकरणी या घोटाळ्यात हात असल्याच्या संशयावरून एका बँक कर्मचाऱ्याला देखील अटक करण्यात आली होती. त्यांच्या नावावर तीनशे हून अधिक मालमत्ता असून फसवणुकीची रक्कम वसूल करण्याकरिता त्यांची लिलाव प्रक्रिया चालू आहे. मात्र अजूनही गुंतवणूकदारांचे पैसे प्रलंबित आहेत.












