पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : राखी खरेदी करण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या दोन मुलींचे अपहरण झाल्याचे पोलिसांसह संपूर्ण कुटुंबाला समजले. मात्र, बायकोच्या माहेरील मालमत्तेतून दहा लाख रुपये मिळवण्यासाठी बापानेच मुलींच्या अपहरणाचा कट रचल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर खंडणीचे खोटे फोन करून खंडणीसाठी दबाव टाकणाऱ्या वडिलांना वाकड पोलिसांनी अटक करून मुलींची सुटका केली आहे.
सचिन मोहिते असे अटक आरोपीचे नाव असून याप्रकरणी सारिका कैलास ढसाळ (वय 38) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक रोहित दिवटे व त्यांचे कर्मचारी गस्त घालत होते. कोकणे चौकात काही जण घाईघाईने फिरताना दिसल्याने पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर सारिका ढसाळ यांनी आपली दोन वर्षांची मुलगी आणि बहिण शितल सचिन मोहिते यांची 15 वर्षांची मुलगी बेपत्ता असल्याचे सांगितले. मंगळवारी सायंकाळी दोघीही राखी खरेदीसाठी बाहेर पडल्या होत्या. तेव्हापासून त्या बेपत्ता होत्या.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वाकड पोलिस आणि गुन्हे शाखेचे पथक तयार करून मुलींचा शोध सुरू केला. पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली असता अपहरण झालेल्या मुलीचे वडील सचिन मोहिते हेही हजर होते.
या घटनेची माहिती मिळताच वाघोली येथून आल्याचे सचिनने जबाबात म्हटले आहे. पोलिसांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता, घटना घडली तेव्हा सचिनने कार सर्व्हिसिंगसाठी नेल्याचे शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांना सचिनवर संशय आला.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, दोन्ही मुली सचिनच्या कारसारख्या दिसणाऱ्या कारमधून निघून गेल्याचे दिसून आले. बुधवारी सकाळी पोलीस पुन्हा फिर्यादीच्या घरी गेले असता, सचिनच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, तिची बहीण सारिका हिचा तीन महिन्यांपूर्वी मोबाईल हरवला आहे.
त्या नंबरवरून कुटुंबाला फोन करण्यात आला. तुम्हाला तुमच्या मुली सुरक्षित हव्या असतील तर पोलिसांना न सांगता 10 लाख रुपये द्या असे फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून तपास करून या प्रकरणात सचिन मोहितेचा सहभाग असल्याचा निष्कर्ष काढला. त्यानुसार पोलिसांनी सचिनची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. सासू पुष्पा आल्हाट हिला घाबरवून तिच्या बँकेतील मालमत्तेतून 10 लाख रुपये काढण्यासाठी त्याने असे कृत्य केले असल्याचे कबूल केले.
त्यांनी दोन्ही मुलींना वाघोली येथे सुरक्षित ठिकाणी ठेवले असून सकाळी दहा वाजता वाघोली येथून निघून पीएमसीमध्ये येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी तीन पथके पीएमसीकडे रवाना केली. मात्र प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा जास्त वेळ होऊनही मुली पीएमसीपर्यंत पोहोचल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांचे धाबे दणाणले.
सचिनने मुलींना ठेवलेल्या ठिकाणी जाऊन पोलिसांची पाहणी केली असता तेथेही मुली आढळल्या नाहीत. त्यानंतर पोलिसांनी पीएमपीएल प्रशासनाच्या समन्वयाने वाघोली ते पुणे महापालिकेदरम्यान बसचालक आणि वाहकांशी संपर्क साधून मुलींची माहिती घेतली. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास मुलींना बसमधून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी सचिन मोहिते याला अटक केली आहे.












