पुणे प्रतिनिधी : राज्यातल्या अनेक ठिकाणांसह पुण्यात ही जोरदार पावसाची शक्यता. राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. गेल्या तीन, चार दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पाऊस हजेरी लावत आहे. आता गणरायाच्या आगमनासोबत पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज आय. एम. डी. ने व्यक्त केला आहे.
गणरायाचे आगमन (दि. १९) मंगळवारी होणार आहे. सर्वत्र श्रीच्या प्रतिष्ठापनेची तयारी जोर धरत आहे. मंगळवारी गणरायाच्या आगमन होत असताना पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुण्यासह मुंबई, ठाणे, पालघर व कोकणात मंगळवारी पाऊस असणार आहे तर राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाची शक्यता आहे.
कसे असणार पुढील पाच दिवस
राज्यात पुढील पाच दिवस पाऊस कायम असणार आहे. राज्यातील जवळपास सर्वच भागात मध्यम पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र या पाच दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज नाही. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते पण त्याची तीव्रता आता कमी झाली आहे. आता आग्नेय राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता नाही असे ही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.












