पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २० : पुण्यातील नेहरू तरुण मंडळ ट्रस्टच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा तृतीयपंथी नेत्या श्रीगौरी सावंत यांच्या हस्ते पार पडली. एका तृतीयपंथी समाजाच्या व्यक्तीने प्राणप्रतिष्ठा करणे ही बहुदा महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे.
पूजा संपन्न झाल्यावर भक्तां सोबत बोलताना त्या म्हणाल्या, “स्वप्नात सुद्धा वाटले नव्हती की, हा दिवस माझ्या आयुष्यात येईल, एवढा मानसन्मान मिळेल. माझ्यासारख्या सिग्नलला टाळी वाजवून भीक मागणाऱ्या तृतीयपंथीनसाठी लोक टाळ्यांचा कडकडाट करतील.
आम्ही समाजातील एक वाळीत टाकलेली जमात अशीच मनाची धारणा झाली होती. पण तुमचे काम चांगले असेल, की समाजाचा पाठिंबा कसा मिळतो आणि तुम्हाला काम करण्याची ऊर्जा देऊन जातो, हे कळतच नाही. विस्कलित समाज एकत्र यावा या हेतूने लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सुरू केला. परंतु आम्हीही समाजाचा एक भाग आहोत हे समजण्यासाठी 131 वर्षे लागली. आज मी भरून पावले”. हे बोलताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते.
नंतर पुढे त्या म्हणाल्या, “आम्ही दरवर्षी बापाचे स्वागत करतो, पण यंदाचा उत्सव आमच्यासाठी खूप खास आहे. अस बाप्पाच्या दर्शनासाठी एवढी मोठी व्यक्ती होऊन जेव्हा तुमचे कौतुक करते तेव्हा उत्सवाचे उद्दिष्ट सार्थकी लागले असे वाटू लागते.” असे त्या म्हणाल्या. त्यांचे हे वक्तव्य ऐकून सर्वच जन भावुक झाले.












