पुणे प्रतिनिधी
पुणे, दि. २२ : महिलांना आखाती देशात पाठवून त्यांची फसवणूक करणाऱ्या दलालास गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मुंबईतून अटक केली. पोलिस तपासात महिलांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
महम्मद याह्या फय्याज अहमद (वय २८, रा. ओशिवरा, जोगेश्वरी, मुंबई) असे अटक केलेल्या दलालाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात दलालांकडून काही गरीब महिलांना घरकामासाठी जास्त पगाराचे आमिष दाखवून त्यांची सौदी अरेबियात विक्री केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात चार दलालांवर नुकताच गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार आणि पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या सूचनेनुसार सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक राजेश माळेगावे, पोलिस अंमलदार राजेंद्र कुमावत, मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, अमित जमदाडे यांच्या पथकाने आरोपीला मुंबईतून अटक केली. आरोपीला पुढील तपासासाठी मार्केट यार्ड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. न्यायालयाने आरोपीला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.












