पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २८ : आमदार रोहीत पवार आपल्या सरकार विरोधी भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र आता रोहीत पवार यांच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसत आहे. बारामती अॅग्रो चे रोहित पवार हे मालक आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आमदार रोहित पवार यांना थेट रात्री २ वाजता नोटिस पाठवत बारामतीमधील बारामती ॲग्रो प्लांट ७२ तासांत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. रोहित पवार यांनी स्वतः ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली असून हे घाणेरडे राजकारण असून या विरोधात लढत राहणार असल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे.
या बाबत रोहित पवार यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली. युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत, परंतु अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो.
भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते ही मराठी माणसाची खासियत आहे. हा लढा मी लढणारच आहे, परंतु ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे त्यांना एकच सांगायचंय की, मी आधी व्यवसायात होतो नंतर राजकारणात आलो, परंतु आधी राजकारणात येऊन आणि नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळे या नेत्यांना अपेक्षित असलेले काहीही साध्य होणार नाही. तसेच हे द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणारही नाही, असेही रोहित पवार म्हणाले.












