पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
पत्नी व तिच्या नातेवाइकांनी पतीला बेदम मारहाण करून गंभीर जखमी झालेल्या पतीचा मृत्यू झाला. ही संतप्त घटना महाळुंगे येथील इंगळे गावाच्या हद्दीत रविवारी (दि. १) घडली. गणेश मुरलीधर गारगोटे (वय ५०, रा. महाळुंगे) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी मयत गणेश यांचा भाऊ दिनेश मुरलीधर गारगोटे (वय ३४, रा. गारगोटेवाडी, ता. खेळ, जि. पुणे) यांनी मंगळवारी (दि. ३) महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार मयत गणेश यांची पत्नी, मेहूणी, तसेच मेहूणा पप्पू ऊर्फ राजेंद्र काळुराम भांबोरे, मावस मेहूणा गौरव चांगदेव बोत्रे, सुशांत बाळू बोत्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून रविवारी महाळुंगे इंगळे गावाच्या हद्दीत, शिवळेवाडा व इतर ठिकाणी फिर्यादी यांचा मयत भाऊ गणेश गारगोटे यांना कोणत्या तरी टणक वस्तू, लाथाबुक्क्यांनी तोंडावर, छातीवर, पोटावर डोक्यावर व पाठीस जबर मारहाण केली.
त्यानंतर गणेश यांना गारगोटेवाडी येथील घरी आणून टाकले. गंभीर जखमी झालेल्या गणेश यांना पिंपरी येथील वाय.सी.एम. रुग्णालयात आणले. तिथे उपचार सुरू असताना सोमवारी (दि. २) रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास गणेश यांचा मृत्यू झाला.












