मुंबई प्रतिनिधी
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांचा ईमेल हॅक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने ईमेल हॅक करुन विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट आदेश काढला आहे. पोलिसांच्या सायबर सेलने आरोपीला अटक केली आहे. आरोपीने अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढल्याची माहिती तपासातून समोर येत आहे.
आरोपीला मिरजमधून अटक करण्यात आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६ अधिकाऱ्यांचे बनावट आदेश काढण्यात आलेले होते. गृहमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी विद्याधर महाले यांचा ईमेल आयडी हॅक करुन बदलीसंदर्भात सूचना दिल्या गेल्या. त्यानंतर आदेश काढण्यात आला. या प्रकरणांची गंभीरता लक्षात घेऊन स्टेट सायबरने गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला.
आरोपी मोहम्मद इलियास याला अटक मिरज मधून करण्यात आली आहे. आरोपीने महावितरणमधील काही अधिकाऱ्यांच्या बदलीसंदर्भात बनावट आदेश काढले होते. आरोपीने गृहमंत्री फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी विद्याधर महाले यांच्या नावाचा बनावट ईमेल आयडी तयार केला होता. आरोपी बीई इलेक्ट्रिकल इंजिनिअर असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.












