पुणे प्रतिनिधी
मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांची ऑनलाईन बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीसाठी राज्यातील ३५ जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांपैकी ३० जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. ‘मराठी पत्रकार परिषद’ ही देशातील एकमेव अशी संघटना आहे, ज्यामध्ये दैनिक, साप्ताहिक, डिजिटल न्यूज पोर्टल तसेच युट्युब न्यूज चॅनलच्या पत्रकारांचा ही समावेश आहे. मराठी पत्रकार परिषदेने पत्रकारांमध्ये कधीही भेदभाव केलेला नाही. पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी शासन दरबारी पत्रव्यवहार करून पत्रकारांचा आवाज उठविण्याचे काम करीत आहे.
या बैठकीत प्रास्ताविक करताना अध्यक्ष शरद पाबळे यांनी मागील जिल्हा प्रसिद्धी प्रमुख यांच्या बैठकीचा आढावा सांगितला. तसेच लवकरच राज्यातील सर्व साप्ताहिकांच्या पत्रकारांचा एक मेळावा घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेच्या बैठकीदरम्यान मार्गदर्शन करताना
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख म्हणाले’ गेल्या काही दिवसांपासून साप्ताहिकांच्या पत्रकारांना जाणून-बुजून बदनाम करण्याचे षडयंत्र काहीजण करत आहेत. साप्ताहिकांच्या पत्रकारांना अधिस्वीकृती मिळू नये, यासाठी काहीजण प्रयत्न करताना दिसतात. मात्र साप्ताहिकांमध्ये काम करणाऱ्या पत्रकाराला सुद्धा अधिस्वीकृती मिळावी, यासाठी मराठी पत्रकार परिषद पुढाकार घेत असून साप्ताहिकांच्या हक्कासाठी आपला लढा सुरू राहणारच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले ‘आगामीकाळ निवडणुकीचा असून या काळात पत्रकार व राजकीय मंडळी यांच्यातील संघर्ष वाढत जाईल. अशावेळी आपल्याला सावध राहण्याची आवश्यकता आहे.
सत्तेच्या विरोधात बोलणाऱ्या पत्रकारांना वाईट अनुभव येताना दिसतात. पत्रकारांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या सदस्यांनी ऍक्टिव्ह राहण्याची आवश्यकता आहे. तसेच ज्या जिल्ह्यात अद्याप पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती तयार झाली नाही, त्या जिल्ह्यातून तत्काळ या समितीच्या सदस्य पदासाठी जिल्ह्यातील पत्रकारांचे नाव देणे गरजेचे आहे. येत्या ३ डिसेंबर रोजी मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात येणार असून यानिमित्त राज्यभर आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये राज्यातील दहा ते पंधरा हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी होईल, यादृष्टीने नियोजन सुरू असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली.
यावेळी विश्वस्त किरण नाईक यांनी सांगितले की, ‘मराठी पत्रकार परिषदेचे आतापर्यंतची वाटचाल ही खूपच महत्त्वपूर्ण आहे. राज्यभरातील प्रसिध्दी प्रमुख हे परिषदेचे कान व डोळे आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याची राज्यपातळीवर नोंद घेतली जात असते. जिल्हा प्रसिद्ध प्रमुख म्हणून तुम्ही परिषदेचे कामकाज, हे गाव पातळीवर पोहोचवण्यासाठी जे प्रयत्न करता ते कौतुकास्पद आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्याला मदत करण्यासाठी परिषदेचे राज्यातील प्रत्येक पदाधिकारी कटिबद्ध असून तुम्हाला जेव्हा मदतीची गरज लागेल, तेव्हा आवर्जून हाक द्या’ असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
बैठकीला विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, परिषदेच्या डिझिटल शाखेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे, राज्याचे प्रसिध्दी प्रमुख संदीप कुलकर्णी, सहाय्यक प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, भाऊसाहेब सकट (जि.कोल्हापूर), दिपक शिंदे (जि.सातारा), प्रकाश आरोटे (अहमदनगर उत्तर), गजानन वाघ (वाशीम), विजय घरत (जि.पालघर), कमलेश ठाकूर (जि.रायगड), जमिर खलपे (जि. रत्नागीरी), गोपीभाऊ लांडगे (धुळे), संजय हांगे (बीड), सुनील वाघमारे (छत्रपती संभाजीनगर), सुभाष राऊत (नागपूर), यशवंत थोटे (गोंदीया), राम साळुंके (लातूर), बबलू दोडके (अमरावती), दिगंबर गायकवाड (नांदेड) आदी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख होते.












