पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि.१३ : महिला व बालविकास विभागाच्या मंत्री मा. आदिती तटकरे यांनी माविम आणि टपाल खात्यामार्फत पोस्टल वीक अंतर्गत मेल्स आणि पार्सल दिवसानिमित्त दादर येथील हाँटेल कोहिनूर येथे आयोजित कार्यक्रमाला व्हीडिओ रेकाँर्डिंग द्वारे आपल्या शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्राचे चिफ पोस्टमास्टर जनरल श्री. के.के. शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला आर्थिक विकास महामंडळाचे प्रशासन व वित्त विभागाचे महाव्यवस्थापक श्री. रविंद्र सावंत व महाराष्ट्राचे पोस्ट मास्टर जनरल (मेल्स आणि बीडी) श्री. अमिताभ सिंग यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
टपाल खाते व माविम यांच्यातील सामंजस्य करारामुळे महिलांची आर्थिक उन्नती होणार असून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटांना देश-विदेशात विना अडथळा व जलदरित्या आपली उत्पादने पाठवणे आता सहज शक्य होणार आहे. या पुढे जाऊन टपाल विभाग महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री करण्यासाठी मदत करणार आहेत. ही व्यवस्था एक मैलाचा दगड ठरू शकते. हा उपक्रम प्रथम प्रायोगिक प्रकल्प म्हणून रायगड आणि ठाणे जिल्ह्यात राबविण्यात येणार असून नंतर राज्यातील इतर जिल्ह्यात विस्तारित करण्यात येईल असे महिला व बाल विकास मंत्री मा. आदिती तटकरे म्हणाल्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, या करारमुळे करारामुळे सीएमआरसी या टपाल खात्याच्या वाहतूक BNPL (Book Now Pay Later) व्यवस्था म्हणून काम पाहतील. या व्यवस्थेमुळे सीएमआरसी त्यांच्या कार्यक्षेत्रातील महिलांच्या उत्पादनांची कॅशलेस आणि कॅश ऑन डिलिव्हरी पद्धतीने विक्री करू शकणार आहेत. यामुळे महिलांची उत्पादने महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर देश विदेशात पोहचविणे शक्य होणार आहे.
मंत्री श्रीमती आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली माविम सातत्याने नाविण्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबवत आहे. याचा मला आनंद असून येत्या काळात महिलांच्या मालाला मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. टपाल विभागाची देशभरात १ लाख ६० हजार कार्यालये आहेत. माविमच्या गटांना पिकअप सुविधा देखील टपाल खात्याकडून पुरविण्यात येणार आहे. यासाठी महिलांना जास्त सेवा वापरल्यास सवलत देखील देण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे माविमच्या व्यवस्थापकीय संचालक मा. डाँ. इंदू जाखड (भा.प्र.से.) यांनी सांगितले.
या कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. अमिताभ सिंग यांनी केली तर उपस्थितांचे आभार डाँ. अजिंक्य काळे यांनी मानले.












