धर्माची प्रासंगिकता ही केवळ व्यक्तीच्या उद्धारात नसते. शांतता, सुव्यवस्था, स्वातंत्र्य, समता, प्रगती, आणि विकास यांच्याशी संबंधित सामाजिक परिस्थिती निर्माण करण्यातही धर्माची प्रासंगिकता असते.
भारत देशाचे मूळ हे कोणत्या एका धर्मावर नाही तर विविधतेत एकता या संकल्पनेत रुजलेली आहे. धर्मनिरपेक्षता ही काळाच्या ओघात निर्माण झालेली संकल्पना आहे. त्याबरोबरच धर्मभेद जातीवादी या पैलूंची उत्पत्ती झाली. काळानुसार या संकल्पनेचा तसेच या पैलूंचा वापर राजकारणात मोठ्या प्रमाणात होत गेला. साल 2014 अगोदर एकता सर्वधर्मसमभाव या विचारांची बढती होती.
भारतात धर्मावर राजकारण हे इंग्रज काळापासून होत आहे. धर्मावरून वाद निर्माण करून लोकांवर वर्चस्व गाजवणे याचा नमुना इंग्रजांनी दर्शविला आहे. या नमुन्याचे जिवंत उदाहरण सध्या बघायला मिळत आहे. प्रत्येक धर्मात ठेकेदार नेमलेले आहेत. हे ठेकेदार राजकारणाशी संबंधित लोकांशी जोडलेले असतात. हे ठेकेदार आणि राजकारणी एकत्र मिळून समाजात धर्मावरून तेढ निर्माण करून, त्या आगीत स्वतःच्या स्वार्थाच्या भाकऱ्या भाजतात.
भारत हा भावनेचा देश मानला जातो आपल्याकडे प्रत्येक गोष्ट भावनेशी जोडली जाते त्यामुळे भावनांच्या आधारे धर्माचा आसरा घेऊन “फोडा आणि राज्य करा“ हे राजकारण केले जाते. याचे ताजे उदाहरण म्हणजे कर्नाटकामध्ये बजरंग दल वरून झालेले राजकारण. तसं बघता बजरंग दल आणि आराध्य दैवत बजरंग बली यांचा नावाविरहित काही संबंध नाही. त्यामुळे संपूर्ण राज्यात हनुमान चालीसाचे पठण करणे हे चाणाक्ष राजकारण होते. यावरून “फोडा आणि राज्य“ करा या विचारांची प्रचिती येते.
भारताच्या 77 वर्षांच्या राजकारणात जवळच्या काळात खुद्द देशाचे पंतप्रधान एका फिल्मचे व्यासपीठावर प्रमोशन करताना दिसून येतात. लव्ह जिहाद भगवा लव्ह ट्रॅप या आतंकी संकल्पना आहेत. यामध्ये कोणता धर्म, जात, प्रांत यांचा समावेश नाही.
कुराण, भगवद्गीता, बायबल किंवा अन्य कोणताही धर्मग्रंथ आपल्याला धर्मभेद शिकवत नाही. या सर्व संकल्पनेची निर्मिती ही राजकारण्यांनी स्वतःचे राज्य टिकवण्यासाठी केलेली खेळी आहे. धर्म भेदावरून झालेल्या राजकारणाचे परिणाम आपण सर्वांनीच वर्षानुवर्ष अनुभवले आहेत. संभाजीनगर येथे नुकतीच झालेली दंगल हे याचे ज्वलंत उदाहरण आहे. देशात धर्मभेदावरून दोन समाजात पेरलेल्या द्वेषामुळे अनेकदा दंगली घडल्या. या दंगलींमध्ये असंख्य लोक मारले गेले परंतु ज्यांनी या विचारांची पेरणी केली ते मात्र आरामात आपलं जीवन सुखाने जगत आहेत. 1992 साली बाबरी मज्जिद वरून झालेल्या दंगली मध्ये असंख्य मृत पावले. त्याचे पडसाद अजूनही दिसून येतात. त्याच दंगलीचा परिणाम नंतर बाकीच्या राज्यांमध्ये दिसून आला. मुंबई, राजस्थान, बिहार, भोपाळ, कलकत्ता, सुरत, कानपूर, आसाम, अशा देशातील विविध भागात मानवतेचे भयान रूप पाहायला मिळाले. या सर्व दंगलींमधून झालेले उद्रेक अजूनही दोन समाजात तेढ निर्माण करण्यास सक्षम आहे.
स्वार्थी मानवी वृत्तीतून उत्पन्न झालेल्या या विचारांची पेरणी फार आधी झाली आहे. काळाच्या ओघात प्रत्येकाने आपल्या भाकऱ्या भाजायला याचा चाणाक्ष उपयोग करून घेतला. आधुनिक तंत्रज्ञान, विकास, रोजगार, महागाई, या सर्व बाबींपासून लोकांना लांब न्हेण्यासाठी धर्माची चादर वापरली जात आहे. शेवटी धर्म धर्म म्हणजे काय हो? धर्माच्या नावाखाली आपले हितसंबंध पूर्ण करणारे धर्माचे दलाल किंवा ठेकेदार अध्यात्मिक सत्याला जडवादी पांघरूण घालण्याचा वारंवार प्रयत्न करतात. त्यांच्यामुळे मनाच्या आंतरिक शुद्धीची जागा बाह्य आचरण घेते. ढोंगीपणा वाढू लागतो. गैरवर्तनाला खतपाणी मिळू लागते. धार्मिक व्यक्ती कधीही स्वार्थी असू शकत नाही.
धर्माचा संबंध आचरणाशी आणि वर्तणूकिशी आहे. तत्वज्ञान आणि धर्म यात फरक आहे. तत्त्वज्ञान मार्ग दाखवते, त्या मार्गावर आपण धर्माच्या प्रेरणेने वाटचाल करतो. आपण कोणत्या प्रकारचे आचरण करावे – हे ज्ञान तत्त्वज्ञानातून मिळते. ज्या समाजात तत्त्वज्ञान आणि धर्म यांच्यात एकवाक्यता असते, ज्ञान आणि कृती यांच्यात सुसंवाद असतो, त्या समाजात शांतता असते आणि समाजामध्ये परस्पर मैत्री असते.प्रत्येक धर्माचे आपल्या ग्रंथातून केवळ मानवतेचा धर्म श्रेष्ठ हा संदेश दिला आहे. मानवतेचा धर्म हाच खरा धर्म आहे.
धर्म कि विचार












