पुणे प्रतिनिधी
पुणे : ‘कॉल गर्ल’ची भेट एका ७४ वर्षीय नागरिकाला चांगलीच महागात पडली. पोलिसांच्या कारवाईची भीती दाखवून आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाला ३० लाख रुपयांना लुबाडले. इतकेच नव्हे तर आरोपींनी दरमहा एक लाख रुपयाची खंडणी मागितली. अखेर ज्येष्ठ नागरिकाने धाडस दाखवत पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांनी एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
हा प्रकार पाच जुलै ते १७ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत मार्केट यार्ड परिसरात घडला. याबाबत गोखले नगर येथील एका ज्येष्ठ नागरिकाने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ज्योती बनसोडे आणि रामचंद्र बापू कोरडे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने जुलैमध्ये ज्योतीमार्फत एका कॉल गर्ल’ची भेट घेतली होती. त्यानंतर ज्योतीने फिर्यादीला फोन केला. ‘त्या ‘कॉल गर्ल’ला पोलिसांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. तिच्या मोबाईल कॉल रेकॉर्डमध्ये तुमचा कॉल आहे. पोलिस या गुन्ह्यात तुमचेही नाव टाकतील,’ अशी भीती दाखवून पैसे मागितले त्यामुळे प्रतिष्ठेपोटी या ज्येष्ठ नागरिकाने आरोपींना रोख आणि धनादेशाद्वारे वेळोवेळी ३० लाख ३० हजार रुपये दिले.
परंतु आरोपींचे पैशांचे लालच थांबत नव्हते. आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाला पुन्हा पाच लाखांची खंडणी मागितली. शिवाय, दरमहा एक लाख रुपये न दिल्यास पोलिस कारवाई करतील, अशी धमकी दिली. आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून ज्येष्ठ नागरिकाने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर त्यांनी मार्केट यार्ड पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.












