पुणे | प्रतिनिधी
पुणे,दि. २१ : अजमेरा येथील मासळूकर कॉलनीतील एका इमारतीचा पुनर्विकास (रिडेव्हलपमेंट) चा काम सुरू असून बांधकामाचा राडारोडा, खडी हे सार्वजनिक रस्त्यावर टाकण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे. सदर बाबतची तक्रार करुनही महापालिकेकडून बिल्डरवर कारवाईस टाळाटाळ केली जात आहे.
सारथीवर केलेल्या तक्रारीलाही उत्तर दिले जात नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, स्थापत्य आणि आरोग्य विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत.
अजमेरा येथील स्थानिक रहिवाशी शैलेश मोरे यांनी महापालिकेच्या ‘ सारथी ‘ हेल्पलाईनवर या बाबतची तक्रार केली ३ वेळा केली, मात्र एकावेळी पालिकेकडून तक्रारीची दखल घेत याबाबत आर्किटेकला सांगितले जाईल असे सांगितले. पण, कोणताही कारवाई झाली नाही. राडारोडा उचलला नाही. त्यानंतर दोनवेळा सारथीवर केलेल्या तक्रारीला उत्तरही मिळाले नाही.
याबाबतची अधिक माहिती देताना मोरे म्हणाले, मासूळकर कॉलनीतील पूर्वीच्या सुखवानी पार्कचे रिडेव्हलपमेंटचे काम चालू आहे. या कामासाठीचे साहित्य सार्वजनिक रस्त्याच्या मध्यभागी टाकले आहे. खडी, वाळू, लाकडे, खडी मशिन रस्त्यावर उभी केली आहे. या साहित्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला असून त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरुन ये-जा करता येत नाही.
धोकादायकरित्या ये-जा करावी लागत आहे. चेंबरचे झाकणही तुटले असून त्यावर फळी टाकण्यात आली. एखाद्याचा फळीवर पाय पडुन फळी तुटल्यास चेंबरमध्ये पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिकांची मोठी संख्या आहे. त्यांना रस्त्याने ये-जा करता येत नाही. सकाळी आठ वाजताच कामाला सुरुवात केली जाते. दिवसभर कामाचा आवाज येतो. परिसरातील नागरिकांना त्याचा मोठा त्रास होत आहे. सकाळी नऊनंतर काम सुरु करावे. रविवारी सुद्धा काम सुरु असते. परिसरातील नागरिकांना रविवारी देखील आवाजामुळे आराम करता येत नाही.
त्यामुळे रविवारी काम बंद ठेवावे. रस्त्यावरील साहित्य बाजूल करुन रस्ता नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोकळा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. सार्वजनिक रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकले असताना महापालिका प्रशासन यावर कारवाई का करत नाही असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
स्थापत्य आणि आरोग्य विभाग जबाबदारी ढकलताहेत
याबाबत शहर अभियंता मकरंद निकम म्हणाले, रस्त्यावर राडारोडा टाकल्याप्रकरणी आरोग्य विभागाला दंडात्मक कारवाईचे अधिकार आहेत. आरोग्य विभाग कारवाई करु शकतो. याबाबत आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे यांना विचारले असता बांधकाम परवानगी विभागाचा विषय आहे. बिल्डरने रस्त्यावर साहित्य टाकले आहे. स्थापत्य आणि आरोग्य विभागाकडून टोलवाटोलवी होत असल्याचे दिसते.












