पुणे । प्रतिनिधी
पुणे दि. ३० : तरुणावर धारदार शस्त्राने वार करून पसार झालेल्या सराइत गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 25 ऑक्टोबर रोजी बालाजीनगर येथील शिळमकर पेट्रोल पंपाजवळ घडली होती.
सलमान उर्फ सल्या हमीद शेख (वय 24, चैत्रबन वसाहत, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) वैभव उर्फ बबलू कोठारी (रा. अप्पर इंदिरानगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
शेखविरुद्ध भारती विद्यापीठ, सहकारनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, मारामारी, शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे सात गुन्हे दाखल आहेत. शेखचा साथीदार कोठारी अरण्येश्वर मंदिराजवळ थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी सुशांत फरांदे यांना मिळाली. कोठारीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा रस्त्यावर बालाजीनगर परिसरातील पेट्रोल पंपाजवळ पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर दोन लोकांनी तीक्ष्ण शस्त्राने वार केले. तसेच आरोपींनी पेट्रोल पंपाजवळ दहशत माजवत पसार झाले होते, या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. अप्पर इंदिरानगर भागातील बिरामणे टोळीतील शेख आणि साथीदारांनी तरुणावर हल्ला केल्याची माहिती पोलीस नाईक अमोल पवार आणि निलेश शिवतारे यांना मिळाली. सापळा लावून शेखला पोलिसांनी ताब्यात घेतले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल खंडाळे, बापू खुटवड, अमोल पवार, निलेश शिवतारे, सुशांत फरांदे, संजय गायकवाड, महेश मंडलिक आदींनी केली.












