राज्यात मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. मराठवाड्यात आंदोलन अधिक उग्र झाले असून आमदारांचे घर आणि कार्यालय पेटवले गेले. या पाठोपाठ बसेसही फोडण्यात आल्या. त्यामुळे बीडमध्ये संचारबंदी लागू करण्याचा आदेश प्रशासनाने कालच घेतला होता.
बीड, धाराशिव पाठोपाठ आता छत्रपती संभाजीनगरमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या जिल्ह्यातही मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे हिंसक घटना टाळण्याच्या उद्देशाने प्रशासनाने या जिल्ह्यातही संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. बीडमध्ये अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत ही संचारबंदी कायम राहणार आहे.












