दारू पिऊन आलेल्या एका व्यक्तीने फुटपाथवर झोपण्याच्या कारणावरून ७५ वर्षीय नागरिकाचा धारदार शस्त्राने वार करत खून केला, ही घटना खडकी बाजार परिसरात काल (दि. ५) रोजी रात्री घडली.
मंगेश भागाजी भद्रिके (वय ७५, रा. खडकी रेल्वे स्थानकासमोर) असे खून झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी विकास रामचंद्र गायकवाड (वय ५२, रा. खडकी बाजार चौपाटी) याला अटक केली आहे. खडकी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी या संदर्भात खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भद्रिके गायकवाड खडकी बाजार परिसरात किरकोळ कामे करतात. दोघे जण खडकी रेल्वे स्थानकासमोर पदपथावर राहायला आहेत. दोघे परगावचे आहेत. पदपथावर झोपण्याच्या जागेवरुन त्यांच्यात वाद झाला होता.
आरोपी गायकवाड दारु पिऊन रात्री आला. झोपेत असलेल्या भद्रिके यांच्यावर त्याने तीक्ष्ण शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या भद्रिके यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पसार झालेल्या गायकवाडला पोलिसांनी अटक केली आहे. खडकी पोलीस तपास करत आहेत.












