वाकड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला चिंचवड पोलिसांनी अटक करत त्याच्याकडून कोयता आणि कार जप्त केली आहे. ही कारवाई श्रीधरनगर चिंचवड येथे करण्यात आली असून अशोक मरीबा तुपेरे (वय २४ रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळच्या वेळी पायी पेट्रोलिंग करण्याबाबत सर्व पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. श्रीधरनगर परिसरात पायी पेट्रोलिंग करत असताना चिंचवड पोलिसांना एक तरुण संशयितपणे कारसह थांबलेला दिसला. त्याच्या कारच्या काचा काळ्या रंगाच्या होत्या. त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला हटकले.
पोलिसांनी हटकताच तो पळू लागला. पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक कोयता आढळला. त्याच्याबाबत माहिती घेतली असता त्याच्यावर सन २०२२ आणि सन २०२३ मध्ये अंमली पदार्थ बाळगणे आणि विक्री करणे याबाबतचे दोन गुन्हे दाखल असून तो त्या दोन्ही गुन्ह्यात फरार होता.
तसेच आरोपी अशोक तुपेरे याच्या विरोधात यापूर्वी वाकड पोलीस ठाण्यात ६ (सहा) आणि चिंचवड पोलीस ठाण्यात १ (एक) गुन्हा दाखल आहे. आरोपीला अटक करून त्याच्याकडून ९३ हजार रुपये रोख रक्कम आणि कार असा एकूण ६ लाख ९३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त विवेक पाटील, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव तलवाडे, पोलीस अंमलदार धर्मनाथ तोडकर, सागर आढारी, सचिन सोनपेठे, गोविंद डोके, उमेश मोहिते, रहीम शेख, अमोल माने, पंकज भदाणे, राजेंद्र माळी, सिद्धार्थ खैरे यांनी केली आहे.












