ऐन दिवाळी तोंडावर असताना पुण्यात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. पुण्यातील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकावर वानवडी परिसरात गोळीबार करण्यात आले. झालेल्या या हल्ल्यात संबंधित सराफा व्यावसायिक गंभीररित्या जखमी झाला आहे. गोळीबार करून हल्लेखोरांनी त्यांच्याकडील कोट्यावधीचे सोने लुटले.
पुणे शहरातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत बी. टी. कवडे रस्त्यावर सराफा व्यावसायिकावर गोळीबार झाला. ओसवाल नामक सराफा व्यावसायिकावर हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या. सराफाजवळील कोट्यवधींचा मुद्देमाल घेऊन हल्लेखोर पसार झाले. या घटनेत सराफा व्यावसायिक गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे वानवडी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोळीबाराचे वृत्त समजतात वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
वानवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.












