बरेच दिवस मनात होते काही तरी लिहावे,
मग विचार केला का नाही
पोलिसांच्या जीवनात डोकावून पाहावे…..
नावावरूनच तुम्हाला समजले असेल की मला कोणाबद्दल लिहायचे आहे.पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो.पोलीस हा देखील एक माणूस असतो हे त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर कळते.ते आपल्या संरक्षणासाठी सण-उत्सव,दंगल-मोर्चे प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरत असतात.सततच्या बंदोबस्तामुळे त्यांना घराकडे पाहायला देखील वेळ मिळत नाही.कोणतेही सण-उत्सव त्यांना कुटुंबासोबत साजरे करता येत नाही.कायद्यात राहून काम करताना त्यांना अनेक खडतर प्रवासाला सामोरे जावे लागते.”सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” या पोलिसांच्या ब्रीदवाक्याचा अर्थ म्हणजे सज्जनांचे संरक्षण आणि दुर्जनांचा नाश.अशाच एका वर्दीतल्या नायकाविषयी माहिती घेणार आहोत ज्यांचे नाव आहे पोलीस हवालदार सत्यप्रेम तोंडे.नावाप्रमाणेच बोलण्यात सत्यता आणि देशाप्रती प्रेम हे त्यांना भेटताच अनुभवायला मिळते. पोलीस हवालदार सत्यप्रेम तोंडे हे वारजे माळवाडी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत आहेत.गेली २८ वर्ष ते या क्षेत्रात आहेत.याआधी त्यांनी ट्रॅफिक पोलीस म्हणून काम पाहिले आहे आणि त्यांचे सामाजिक क्षेत्रात सुद्धा खूप चांगले योगदान आहे.फक्त पोलीस म्हणून नाही तर एक माणूस म्हणून देखील ते आपली जबाबदारी निभावताना दिसतात.
बीड जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागातून पुण्यात स्थायिक झालेले सत्यप्रेम तोंडे हे एका शेतकरी कुटुंबाचा भाग आहेत.मोठा भाऊ हा पोलीस दलात असल्यामुळे त्यांच्याकडून प्रेरणा घेत ते पोलीस दलात भरती झाले.पोलीस दलात भरती प्रक्रियेसाठी ते शेतात काम करून उरलेल्या वेळात भरतीसाठी सराव करायचे.अनवाणी पायाने ते मैदानी परीक्षेची तयारी करायचे.त्या काळात असा पोलीस भरतीचा खडतर टप्पा त्यांनी पार केला आहे.
सत्यप्रेम यांचे त्यांच्या वरिष्ठ आणि सहकाऱ्यांशी अगदी मैत्रीपूर्ण संबंध होते.ट्रॅफिकविषयी बोलताना ते सांगतात भारतात अजूनही अनेकांना ट्रॅफिकविषयी अज्ञानपणा आहे.१९८९ पर्यंत देशात वाहनांची संख्या ही अगदी कमी होती.नंतर वाहने आणि अपघाताचे प्रमाण दोन्हीमध्ये वाढ झालेली दिसून येते.बऱ्याच लोकांना ट्रॅफिकच्या नियमांबद्दल काहीएक माहिती नसते.रस्त्यावर वाहने चालवताना नियम हे पाळले जात नाहीत.सिग्नल तोडल्यानंतर देखील लोक पावती करायला तयार नसतात.
पोलीस पदाचा समाजासाठी काय उपयोग करता येईल या शोधात ते नेहमी असतात.लोकांना मार्गदर्शन करणे,त्यांना उद्योग-धंद्याला लावणे,खेड्यातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे,धार्मिक मंदिराच्या जिर्णोद्दारासाठी देणगी देणे अशी अनेक समाजोपयोगी कामे त्यांनी केली आहेत.
या प्रवासात त्यांना खूप चांगली लोक भेटली.प्रत्येक पोलिसांना १०-१२ तासांपेक्षा जास्त वेळ काम हे करावे लागते.अनेक वेळा त्यांनी ट्रॅफिक विषयी जागरूकता निर्माण केली आहे.रस्त्यांवरच्या लोकांच्या अडचणी देखील जाणून घेतल्या आहेत.प्रत्येक पोलीस हा समाजकार्य करत असतो.खेड्यापाडयातील लोकांसाठी रोजगार कार्यशाळा चालू करण्याची त्यांची इच्छा आहे.
समाजकार्यात त्यांची पत्नी व मुलगा वेळोवेळी त्यांची साथ देत असतात.गुन्हेगार हे आधीपासून सराईत गुन्हेगार नसतात त्यामुळे त्यांच्याविषयी मत मांडणे हे योग्य नाही.पण कायदा हा गुन्हेगारांसाठी कडकच असला पाहिजे असे त्यांचे मत आहे.आजकाल शासन देखील गुन्हेगारांना सुधारण्यासाठी वेगवेगळ्या योजना या राबवत असते.
त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग म्हणजे ते ट्रॅफिक मध्ये काम करत असताना पावसाळ्याच्या दिवसात बूट भिजून पायाला चिखल्या झाल्या होत्या.पण दररोजच्या कामाच्या ओघात ते डॉक्टरांकडे जायला विसरून जात.एकदिवस टपरीवर चहा पीत असताना त्यांनी बूट काढून ठेवला होता.तो चिखल्या झालेला पाय तेथील एका व्यक्तीने पाहिला व मेडिकल मधून त्यांच्यासाठी गोळ्या – औषधे घेऊन आला. सत्यप्रेम तोंडेंनी त्याला पैसे देऊ केले असता त्याने नकार दिला.आजकाल आपण पाहतो पोलिसांना नावे ठेवणारी बरीच मंडळी भेटतील पण पोलिसांना मदत करणारा त्या माणसासारखा क्वचितच सापडेल.त्यामुळे हा प्रसंग त्यांचा आयुष्यातील न विसरता येणारा प्रसंग होता असे ते सांगतात.
एमपीएससी करणाऱ्या मुलामुलींनी नोकरी हा विषय डोक्यात ठेवला तर साहजिकच एवढ्या नोकऱ्या ह्या उपलब्ध नाहीत. एकाच नोकरीमागे पळल्यामुळे ही मुले – मुली यांचे वयही निघून जाते आणि नोकरी नसल्यामुळे हे बेरोजगार होतात.आई – वडिलांना मदत करत तोपर्यंत मिळेल ती नोकरी करत एमपीएससी करावी असे माझे ठाम मत आहे असे सत्यप्रेम तोंडे सांगतात.












