महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेवर झोळी डावावर विजयी
कोण होणार महाराष्ट्र केसरी ही कुस्ती शौकिनांची उत्कंठा काही क्षणात संपली. महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचे (पुणे) तगडे आव्हान वाशिमच्या सिकंदरने काही क्षणात पेलले. कुस्तीचे जग जिंकू पाहणाऱ्या सिकंदरने तुफानी ताकदीच्या शिवराजला समोरुन झोळी बांधून फक्त बावीस सेकंदात चितपट करीत हुलकावणी देत असलेल्या महाराष्ट्र केसरी किताबावर आपले नाव कोरले. महाराष्ट्र केसरी किताब जिंकल्यावर सिकंदरच्या चाहत्यांनी जल्लोष केला.
प्रदीपदादा कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ६६ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित महाराष्ट्र केसरी किताबसाठी अंतिम लढत सिकंदर शेख आणि गतवर्षीचा विजेता शिवराज राक्षे यांच्यात झाली.
अंतिम फेरीत डबल महाराष्ट्र केसरी किताबाला गवसणी घालण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गतविजेत्या तुफानी ताकदीच्या शिवराजचा विजयी घोडदौड रोखण्याचे तगडे आव्हान सिकंदर पुढे होते. माती गटातील विजेतेपद जिंकल्यामुळे सिकंदरचा आत्मविश्वास वाढला होता. शिवराज त्याला कडवे आव्हान देईल अशी अपेक्षा होती. मात्र, वेगवान आणि आक्रमक कुस्ती खेळणाऱ्या सिकंदरपुढे शिवराजचा निभाव लागला नाही. लढतीला सुरुवात झाल्यावर अवघ्या काही सेकंदात सिकंदरने समोरुन झोळी बांधून शिवराजला धोकादायक स्थितीत नेहून चितपट करून विजेतेपदाचा मान मिळविला.
गतवर्षी पुण्यात झालेल्या पराभवाचे उट्टे काढीत जेतेपदाला गवसणी घातली.त्याला मानाची गदा थार गाडी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, स्वागताध्यक्ष, पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदीप कंद, कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, विलास कथुरे, सरचिटणीस योगेश दोडके उपस्थित होते. विजेत्या सिकंदरला थार गाडी, गदा असे पारितोषिक देण्यात आले. उपविजेता शिवराज ट्रॅक्टरचा मानकरी ठरला.
वाशीम जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारा सिकंदर शेख हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा मल्ल आहे. त्याचे वडील हमाली करतात. सामान्य कुटुंबातील सिकंदरने कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत सराव करीत मैदानी कुस्तीत उत्तर भारतीय मल्लांना पराभवाचे पाणी पाजून मोठा पल्ला गाठला आहे. कुस्ती क्षेत्रात त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. महाराष्ट्र केसरी किताब जिंकण्यासाठी गेली चार वर्षे तो सातत्याने आखाड्यात लढत होता मात्र अनेकदा यशाने त्याला पाठ दाखवली होती. मात्र आज अपयशाला देखील त्याच्या जिद्दीपुढे नमते घ्यावे लागल्याने महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यातील तो सिकंदर ठरला .
माती विभागात झालेल्या अंतिम लढतीत पहिल्या फेरीतच सिकंदरने संदीपवर “लपेट” या हुकमी डावावर सातत्याने ताबा घेत गुणांचा फलक हालता ठेवून तांत्रिक गुणाने विजय मिळवला. भोसले व्यायाम शाळा सांगली येथे सराव करणाऱ्या संदीपने थेट माती विभागात अंतिम फेरीत धडक मारली होती.गादी विभागात शिवराज राक्षेने कमालीचा चपळपणा दाखवला पुणे जिल्ह्यातील हर्षद उर्फ माऊली कोकाटेचा तांत्रिक गुणाधिक्याने पराभव करून अंतिम फेरी गाठली. गादी विभागात आज माऊलीची शिवराजच्या आक्रमक पवित्र्यामुळे डाळ शिजली नाही.
अन्य निकाल – माती विभाग – ६५ किलो रोहन पाटील (कोल्हापूर) वि.वि. यश मगदूम (गडचिरोली), ७४ किलो -अनिल कचरे (पुणे) वि.वि. संदेश शिषमुळे (गडचिरोली) , ७० किलो – निखिल कदम (पुणे) वि.वि. अभिजित भोसले (सोलापूर), ६१ किलो – अमोल वालगुडे (पुणे जिल्हा) वि.वि. भालचंद्र कुंभ (पुणे), ५७ किलो – सौरभ इंगवे (सोलापूर) वि.वि. कृष्णा हरणावळ (पुणे), ८६ किलो – विजय डोईफोडे (सातारा) वि.वि. ओंकार जाधवराव (पुणे) गादी विभाग ६१ किलो – पवन डोन्हर (नाशिक) वि.वि योगेश्वर तापकिर (पिंपरी चिंचवड), ७० किलो – विनायक गुरव (कोल्हापूर) वि. वि. संकेत पाटील (कोल्हापूर), ५७ किलो – आतिश तोडकर (बीड) वि.,वि. आकाश सलगर (सोलापूर). ७४ किलो – शुभम थोरात (पुणे ) वि.वि. राकेश तांबुलकर (कोल्हापूर)
निर्णायक विजय
महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत अनेकदा प्रतिस्पर्धी मल्ल एकमेकांना संरक्षण क्षेत्राच्या बाहेर ढकलून गुण मिळवतात.किंवा नकारात्मक कुस्ती केल्यामुळे गुण मिळतात मात्र आजच्या लढतीत सिकंदरने सुरवातीला आक्रमक पवित्रा घेत शिवराजची झोळी बांधून निर्णायक विजय मिळवला.
वस्तादांचे स्वप्न पूर्ण केले याचा आनंद आहे.
गंगावेश तालमीला महाराष्ट्र केसरीची गदा हुलकावणी देत होती. महाराष्ट्र केसरीची गदा जिंकणे माझे स्वप्न होते. गदा जिंकण्यासाठी माझा प्रयत्न होता मात्र अपयश येत होते.आजच्या स्पर्धेत मी मानाची गदा जिंकून गंगावेश तालमीचे वस्ताद विश्वास हरुगले ,उत्तम वस्ताद,चंदू काळे आणि माझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे याचा मनस्वी आनंद झाला आहे.
– सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी












