पुण्यात झालेल्या पावसामुळे शहराच्या विविध भागात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न उपस्थित झाला. पुणे शहरात हवामान विभागाकडून जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.
शुक्रवारी (ता. १०) सायंकाळी पाच वाजता मुसळधार पावसाने पुण्याला झोडपले. सहा वाजेपर्यंत एक मिलीमीटर पावसांची नोंद झाली. एका तासात पडलेल्या पावसाने मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
सायंकाळी ५ वाजता पुण्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडला. कोथरूड, धायरी, बिबवेवाडी, आंबेगाव, कोंढवा, येवलेवाडी धनकवडी, पद्मावती, सिंहगड रस्ता, शिवाजी नगर, विद्यापीठ परिसर, बाणेर रोड, औंध, पाषाण या भागामध्ये या भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते.
रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने वाहनचालकांना वाट काढण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. रस्त्यावरील खड्डे, बेशिस्त वाहनचालक यामुळे शहरात नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यात पावसाच्या हजेरीमुळे वाहतूक कोंडीत भर पडली.
खरेदीसाठी नागरिकांची रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरु होती. तसेच नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढताना कसरत करावी लागत होती. त्यामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झालेली दिसून आली












