इंद्रायणी नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. या दूषित पाण्यामुळे नदीत दररोज शेकडो मासे मरत आहेत. दररोज मासे मरत असल्याने नदीच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
गेल्या दोन आठवड्यांहून अधिक काळ इंद्रायणी नदीत मासे मृत्यूमुखी पडत आहेत. इंद्रायणी नदीचा उगम लोणावळा परिसरात होतो. लोणावळ्यातील वसाहती आणि कंपन्यांचे रसायनमिश्रित पाणी थेट इंद्रायणी नदीत सोडले जात असल्याचे वारंवार समोर आले आहे. मात्र प्रशासनाकडून कोणतीही कठोर कारवाई केली जात नाही. त्यामुळे इंद्रायणी नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली.
देहूगाव नगरपालिकेच्या वतीने इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्याचे काम केले जाते. मात्र देहूगाव मंदिर परिसरातील घाटावर पाण्याचा चिरा तसाच कायम आहे. त्यामुळे पालिकेची चिरे हटाव मोहीम नेमकी कुठे सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाढलेल्या शेवाळ आणि प्रदूषित पाण्यामुळे नदीच्या पाण्यात ऑक्सिजन कमी होतो. त्यामुळे जलचर विशेषतः मासे पाण्याच्या पृष्ठभागावर येतात. पण ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांचा मृत्यू होतो.
देहूगाव येथील इंद्रायणी नदी घाटावर गेल्या काही दिवसांपासून मृत मासे पडून आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. हे मासे स्थानिक नागरिक गोळा करत आहेत. मात्र घाटावर येणारे पक्षी मेलेले मासे उचलून इतरत्र फेकून देत असल्याने ग्रामस्थांची अडचण होत आहे.
आषाढी वारीचा पालखी सोहळा अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्रभरातून भाविक देहू शहरात येतात. येत्या काही दिवसांत देहू शहरात यात्रेकरूंचे आगमन सुरू होणार आहे. मात्र त्यापूर्वीच मेलेल्या माशांमुळे पसरणाऱ्या दुर्गंधीने शहर व्यापले आहे. यावर वेळीच तोडगा काढण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
इंद्रायणी नदीत दूषित पाण्यामुळे शेकडो माशांचा मृत्यू











