पुणे । प्रतिनिधी
पुणे दि. १४ :
सामाजिक बांधिलकी ठेवून सर्वसामान्यांच्या कल्याणकारी पत्रकारितेचा वसा हाती घेऊन मराठवाड्यात अण्णा यांनी एक दरारा ठेवला होता. सकाळी दै. मराठवाडा वृत्तपत्रात बातम्या, संपादकीय लेख वाचून अनेकांना घाम फुटतो आहे हे क्षणोक्षणी जाणवत होते.
सा. लौकिक मध्ये व त्यानंतर दै. अजिंठा, पुण्यातील दै. सकाळच्या छत्रपती संभाजी महाराज नगर येथील आवृत्तीत कार्य करताना जाणवत होते. पत्रकारिता अभ्यासक्रम सुरू असताना दै मराठवाडा आणि अण्णा म्हणजे एक धगधगत्या निखाऱ्याची दमदार ऊंब असल्याची जाणीव झाली होती.
मराठवाड्याची अस्मिता आणि स्वाभिमानी माणसं लोकचळवळीच्या माध्यमातून अण्णांनी उभी केली होती हेही उमगले. नवख्या माणसाला कसं आपलं समजायचं आणि आपली भूमिका कशी लक्षात आणून द्यायची ही शिकवण त्यांच्याकडून घ्यावी.
दै मराठवाडा वृत्तपत्रं आज बंद झाले आहे पण अण्णांकडून मिळालेल्या पत्रकारितेचा वसा आजही कायम ठेवण्यासाठी धडपड करणारे अनेक जण आहेत,
स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये सामाजिक जबाबदारीचं भान ठेऊन ज्या पत्रकारांनी आपली लेखणी झिजवली अशा पत्रकारांमध्ये दै. मराठवाडाचे संपादक अनंत भालेराव यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. आज (26 ऑक्टोबर) त्यांचा स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्या आठवणींना दिला हा उजाळा.
पत्रकारितेला सुरुवात
आपल्या पत्रकारितेचा पाया स्वातंत्र्य आंदोलनातच बांधला गेला असं अनंत भालेरावांना वाटत असे. स्वातंत्र्यपूर्व काळात आनंद वाघमारे यांनी मराठवाडा नावाचे एक नियतकालिक काढले होते. त्यावर निजामाने बंदी आणली.
निजामाने बंदी आणली की, वाघमारे पुन्हा नव्या नावाने ते नियतकालिक सुरू करत असत. त्या काळात या नियतकालिकाचे 11 नावे बदलण्यात आली. 1948 मध्ये अनंत भालेराव स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम करत असतानाच मराठवाडासाठी लेख पाठवू लागले. मग नंतर ते ‘मराठवाडा’ मध्येच संपादक म्हणून रूजू झाले.
पाच वर्ष तिथे काम केल्यानंतर ते मराठवाड्याचे संपादक झाले.
जनतेचे प्रश्न मांडणे आणि तो सोडवणे यासाठी दै. मराठवाडाने सातत्याने पाठपुरावा केला.गोविंदभाई श्रॉफ यांच्या चळवळीला अनंत भालेरावांच्या मराठवाडाची साथ असल्यामुळे परिणाम लवकर साधला जात असे असं परभणीचे अॅड. अनंत उमरीकर सांगतात. उमरीकर यांनी अनंत भालेराव यांच्यासोबत काही काळ काम केलं आहे.
ते सांगतात, “एखाद्या प्रश्नाची तड लावायची असे तेव्हा गोविंदभाई आणि भालेराव ही जोडी एकत्र येऊन विचार करत असे एकदा का पक्कं झालं काय करायचं तर गोविंदभाई आपल्या लोकसंग्रहातून आणि चळवळीतून तो प्रश्न उठवत आणि त्या प्रश्नाला भालेराव आपल्या मराठवाडातून उचलून धरत. सातत्य आणि पाठपुराव्यामुळे तो प्रश्न सुटलाच पाहिजे असा या दोघांचा धाक होता.”
पत्रकारितेसाठी तुरुंगवास
1964 मध्ये साखरेचे भाव दुप्पट झाले. या भाववाढीत काळबेर आहे असं हेरून सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल सुराणा यांनी एक लेख लिहिला आणि तो भालेरावांनी मराठवाडात छापला. साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण करून भाववाढ करण्यात आली आणि त्यासाठी तत्कालीन पुरवठा मंत्री तल्यार खान कसे जबाबदार आहेत असा त्याचा आशय होता.या लेखानंतर सुराणा आणि भालेराव यांच्यावर अब्रू नुकसानीचा खटला भरण्यात आला. संपादकांनी माफी मागावी अशी नोटीस त्यांना आली पण पूर्ण विचारांती भालेरावांनी माफी न मागता न्यायालयात जायचे ठरवले. खटल्याचं कामकाज पूर्ण होईपर्यंत वर्ष-दीड वर्ष गेलं. हा खटला इन कॅमेरा होता म्हणजे न्यायालयात काय सुरू आहे याची बातमी बाहेर येत नव्हती.
शक्य ते पुरावे सादर करण्यात आले पण भालेराव हा खटला हरले. त्यामुळे त्यांना आणि सुराणा यांना 1965 मध्ये तीन महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा झाली. खटला जिंकूनही तल्यार खान यांची स्थिती हरल्यासारखीच झाली होती. पुढे तल्यार खान यांना आपलं पद सोडावं लागलं.
तीन महिन्यांची शिक्षा भोगून झाल्यावर सुराणा आणि भालेराव बाहेर आले. त्यानंतर जनतेनी त्यांचे भव्य स्वागत केले होते.
पुढे आणीबाणीच्या काळातही त्यांनी दै. मराठवाडामध्ये सरकारविरोधात अनेक लेख छापले त्यामुळे त्यांना 1975 ते 1977 या काळात तुरुंगवास भोगावा लागला.
पत्रकारांसाठी आदर्श
अनंत भालेरावांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये 9 हजाराहून अधिक अग्रलेख आणि 8 हजारांहून अधिक विशेष लेख लिहिले आहेत… त्यांचे निवडक लेख कावड आणि आलो याची कारणासी या पुस्तकांमध्ये वाचायला मिळतात.गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आणि कोपऱ्यापासून ते कॅलिफोर्नियापर्यंत सर्व विषयांवर त्यांनी लिखाण केले आहे.
ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ यांनी भालेराव यांच्यावर लेख लिहिला होता, त्यात त्यांनी भालेरावांना ‘पत्रकारितेचं ज्ञानपीठ म्हटलं होतं. अगदी योग्य शब्दांत हे वर्णन आहे असंच मला वाटतं. केवळ मराठवाड्याच्याच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून येऊन मराठी पत्रकारितेमध्ये करिअर घडवू पाहणा-या तरुण-तरुणींसाठी ते आदर्श आहेत यात शंकाच नाही.
अनंत भालेरावांसाठी पत्रकारिता म्हणजे ख-या अर्थाने लोकशाहीचा चौथा स्तंभ होती आणि त्याचं पावित्र्य राखण्याबाबत ते कमालीचे आग्रही होते ते म्हणत, “वृत्तपत्रांचं काम हे सत्तेवर अंकुश ठेवणं व ज्यांना आधार नाही त्यांना आधार देणं हेच असलं पाहिजे. तुम्हाला नुसता व्यवसाय करायचा असेल, सिमेंटच्या कारखान्याला असतो तसा धंदा करायचा असेल तर करा. मग फोर्थ इस्टेट म्हणून दावा सांगू नका.”
पत्रकारितेतील त्यांचे आदर्श टिळक, आगरकर आणि आंबेडकर हे होते. त्यांच्याइतकं नाही तर निदान त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावर जरी आपल्याला चालता आलं तर स्वतःला धन्य समजू असं ते त्यांना वाटत असे ते म्हणत, “आपण मराठी पत्रकार ज्या टिळक-आगरकरांची व फुले आंबेडकरांची परंपरा मोठ्या अभिमानाने मिरवीत असतो ती सर्व माणसे सर्वार्थाने समर्थ व जीवनाचा समग्र वेध घेणारी होती. त्यांची पात्रताही मोठी होती.
पत्रकारितेतील त्यांचे आदर्श टिळक, आगरकर आणि आंबेडकर हे होते. त्यांच्याइतकं नाही तर निदान त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावर जरी आपल्याला चालता आलं तर स्वतःला धन्य समजू असं ते त्यांना वाटत असे ते म्हणत, “आपण मराठी पत्रकार ज्या टिळक-आगरकरांची व फुले आंबेडकरांची परंपरा मोठ्या अभिमानाने मिरवीत असतो ती सर्व माणसे सर्वार्थाने समर्थ व जीवनाचा समग्र वेध घेणारी होती. त्यांची पात्रताही मोठी होती.. आपण निदान त्यांनी मळलेल्या वाटेने जाणारे वाटसरू बनलो तरी पुष्कळ झाले. ” हेच त्यांच्या पत्रकारितेचं सार आहे. अण्णांच्या स्मृतीस विनम्रपणे नमन!पत्रकारितेतील त्यांचे आदर्श टिळक, आगरकर आणि आंबेडकर हे होते. त्यांच्याइतकं नाही तर निदान त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावर जरी आपल्याला चालता आलं तर स्वतःला धन्य समजू असं ते त्यांना वाटत असे ते म्हणत, “आपण मराठी पत्रकार ज्या टिळक-आगरकरांची व फुले आंबेडकरांची परंपरा मोठ्या अभिमानाने मिरवीत असतो ती सर्व माणसे सर्वार्थाने समर्थ व जीवनाचा समग्र वेध घेणारी होती. त्यांची पात्रताही मोठी होती.. आपण निदान त्यांनी मळलेल्या वाटेने जाणारे वाटसरू बनलो तरी पुष्कळ झाले. ” हेच त्यांच्या पत्रकारितेचं सार आहे.












