पुणे, दि. १७ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने संविधान दिनानिमित्त दि. २६ व २७ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त दि. २८ नोव्हेंबर रोजी प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून यासाठी नागरिक आणि विविध संघटनांनी यासंदर्भातील सूचना लेखी स्वरुपात माहिती व जनसंपर्क विभागात किंवा pro@pcmcindia.gov.in या मेल वर दि. २० नोव्हेंबरपर्यंत पाठविण्यात याव्यात असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
संविधानाचा विचार आणि संविधानाचे महत्त्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संविधान दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने पिंपरी चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील मोकळ्या मैदानात दरवर्षी २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी संविधान दिना निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले स्मृती दिनानिमित्त देखील प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
यावर्षीही संविधान दिन आणि क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात येणार असून नागरिक, सामाजिक संघटना, संस्था आदींकडून प्रबोधन पर्वानिमित्त सूचना मागविण्यात येत आहेत, असेही आयुक्त शेखर सिंह म्हणाले.












