पुणे, दि. १७ : भामा आसखेड व चासकमान धरण पुनर्वसन अंतर्गत 40 वर्षापासून (Chakan) शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर मारलेले शिक्के काढून सातबारा कोरा करण्यासाठी चाकण शिक्रापूर रस्त्यावर गुरुवारी (दि. 16) भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
बैलगाड्या, बैल जोड्या आणि पाळीव जनावरे घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरल्याने चाकण ते शिक्रापूर रस्त्यावर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
29 ऑक्टोबर 2023 पासून काळुस (ता.खेड ) येथे पुनर्वसनाचे शिक्के काढण्याबाबत व मराठा आरक्षण मिळण्याबाबत बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. कोणताही जबाबदार शासकीय अधिकारी उपोषण ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आलेले नाहीत.त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांकडून रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून भव्य रास्ता रोको आंदोलन चाकण शिक्रापूर रस्त्यावर भोसे (ता. खेड ) या ठिकाणी गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास करण्यात आले. शेतकरी आपल्या बैलगाड्या जनावरांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य रयत क्रांती संघटनेचे युवा घडीचे अध्यक्ष सागर खोत, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक भोसले, पंचायत समितीचे माजी उपसभापती ज्योती आरगडे, मनोहर वाडेकर, प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, सुभाष पवळे, नवनाथ आरगडे, सुभाष पोटवडे, बाजीराव लोखंडे, मोहन पवळे आदींनी तीव्र भावना व्यक्त केल्या.
आंदोलन प्रसंगी मार्गदर्शन करताना सागर खोत म्हणाले”मनोज जरांगे पाटील याच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलन यशस्वी होईल ही भावना सर्वांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या प्रश्नासाठी एकजुटीने संघर्ष करण्याची गरज आहे. या भागातील भामाआसखेड, चासकमान अंतर्गत टाकलेले शिक्के काढून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय रयत क्रांती संघटना गप्प बसणार नाही असा निर्धार खोत यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार मदन जोगदंड यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचून त्यावर निश्चित मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. याठिकाणी चाकण पोलिसांनी कडक बंदबस्त देखील केला होता.












