पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १७ : घरगुती भांडणातून मुलाने ६० वर्षीय आईच्या डोक्यात लाकडी वासा घालून खून केला आहे. ही घटना मंगळवारी (दि.१४) रात्री मामुर्डी येथे घडली. देहूरोड पोलिसांनी निळकंठ अश्रुबा शिंदे ( वय ४१ रा मामुर्डी) याला अटक केली आहे.
याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी मोमीन सुलेमान शेख यांनी फिर्याद दिली आहे. कांताबाई आश्रुबा शिंदे (वय ६०) असे मयत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने राहत्या घरी आई कांताबाई यांच्याशी कौटुंबिक कारणावरून भांडण्यास सुरुवात केली. या भांडणात त्याने चौकोनी आकाराचा लाकडी वासा आईच्या डोक्यात मारला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या व त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
यावरून पोलिसांनी मुलाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास देहूरोड पोलीस करत आहेत.












