पुणे प्रतिनिधी: येरवडा खुल्या कारागृहातून सोमवारी पळून गेलेला कैदी बुधवारी सकाळी आई-वडिलांसोबत कारागृहात माघारी परतला. कारागृह प्रशासनाने येरवडा पोलिसांना याबाबत माहिती कळविल्यानंतर पळून गेलेल्या कैद्याला ताब्यात घेण्यात आले. तो आपल्या आईला भेटायला गेला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
आशिष भारत जाधव (वय ३७, रा. वडगाव धायरी) असे या कैद्याचे नाव आहे. तुरुंग अधिकारी हेमंत पाटील यांनी कैदी पळून गेल्याची तक्रार येरवडा पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावरून पोलिसांनी जाधववर गुन्हा दाखल केला होता. जाधव कुख्यात गुंड असून, त्याच्यावर वारजे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे.
न्यायालयाने २६ मे २०१४ रोजी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तो १६ ऑगस्ट २०२२पासून खुल्या कारागृहात शिक्षा भोगत आहे. जाधवने सोमवारी दुपारी सुरक्षारक्षकांची नजर चकवून कारागृहातून पलायन केले होते. जाधवच्या आईला हृदयविकाराचा झटका आला होता.
आईला भेटण्यासाठी तो कारागृहातून पळून गेल्याचा प्राथमिक अंदाज कारागृह प्रशासनाने वर्तविला आहे. येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने प्रशासनाने पोलिसांना कैदी माघारी परतल्याची माहिती दिली. पोलिसांनी कारागृहात येऊन जाधवला ताब्यात घेतले.












