बाणेर येथे गणराज चौका जवळ मुख्य रस्त्यावर केतन वीरा बिल्डरचे बांधकाम सुरू आहे. बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान या बिल्डिंगच्या पहाडाचे काम सुरू असताना या बिल्डिंग वरून सळई मुख्य रस्त्यावर पडली.
शाळेतून घरी जाणाऱ्या रुद्र केतन राऊत (वय-९) रा. विरभद्र नगर बाणेर, याच्या डोक्यात सळई पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावरती जुपिटर हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यात येत होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मुख्य चौकामध्ये एवढ्या कमी फ्रंट मार्जिन मध्ये बांधकामाला परवानगी कशी देण्यात आली. तसेच बांधकामावर सुरक्षा उपाययोजनांचे काटेकोर पालन करण्यात आले नाही. इमारतीच्या बाबतीत अनेक त्रृटी असताना देखील पालिका अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत याची सखोल चौकशी करून बांधकाम व्यावसायिकावर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत व सदर बांधकामाला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी नागरिक करत आहेत. याबाबत चतु:र्श्रुंगी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आहे.












