पुणे प्रतिनिधी; पुणे, मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील सुमारे सव्वालाख गृहनिर्माण सोसायट्यांना आणि त्यातील रहिवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आता सहकार विभागाने नियमावली किंवा कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता समिती नियुक्त करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून तक्रारी सोडविण्यासाठी कोणती कार्यपद्धती असावी हे निश्चित केले जाणार आहे. तक्रारी सोडविण्याची कार्यपद्धतीमध्ये सुसूत्रता येणे शक्य होणार आहे. नव्या वर्षात त्याची अंमलबजावणी होणार आहे. पुण्यासह राज्यातील सहकारी गृह निर्माण सोसायट्यांमधील सदस्यांना त्यांच्या समस्या घरबसल्या सोडविता याव्यात यासाठी सहकार विभागाने पुढाकार घेतला आहे. ‘सहकार संवाद’ नावाचे ऑनलाइन पोर्टल कार्यान्वित केले आहे. या पोर्टलद्वारे राज्यातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांसह तेथील रहिवाशांना तक्रारी करता येणार आहे. तसेच त्याचा पाठपुरावाही करता येणे शक्य होणार आहे.
गृहनिर्माण सोसायट्यांसाठी सहकार विभागाची नियमावली












