राज्यात एकीकडे थंडीचा जोर वाढत चालला आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसाचं संकट आलं आहे. आज राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
आज शनिवारी राज्यातील तब्बल 25 जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात काही भागात पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. असे जर झाले तर शेतकऱ्यांच्या अडचणी मात्र वाढतील. त्यामुळे या काळात शेतकऱ्यांना पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ठाणे, पालघर, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव या जिल्ह्यांत पावसाची शक्यता असून हवामान खात्याने या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट जारी केला आहे.
विदर्भातील अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम यवतमाळ तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, धुळे या जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल अशी शक्यता आहे. राज्यात सध्या काही ठिकाणी पाऊस होत आहे. या काळात सहसा पाऊस होत नाही.
मात्र आता पाऊस होत असल्याने आणि आणखी काही दिवस पावसाची शक्यता व्यक्त झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या काळात अनेक ठिकाणी पिके काढणीची कामे सुरू आहेत. तसेच शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाचीही तयारी केली आहे. आणि नेमक्या याच वेळी पावसाची चिन्हे दिसत आहेत












