ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामुळे गाजत असलेल्या ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. विनायक काळे यांची पुन्हा नियुक्ती केली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने बुधवारी रात्री उशिरा याबाबतचा आदेश काढला.
मॅट आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता शासनाने ही पुर्ननियुक्ती केली आहे. राज्य शासनाने या वर्षी जानेवारी महिन्यात डॉ. विनायक काळे यांची बदली महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेवर केली होती. त्यांच्या जागी डॉ. संजीव ठाकूर यांची नियुक्ती केली होती.
राजकीय वजन वापरुन डॉ.ठाकूर यांनी ही नियुक्ती मिळविली होती. त्याविरोधात डॉ. काळे हे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) मध्ये गेले होते. मॅटने सहा महिन्यानंतर जुलैमध्ये काळे यांच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर डॉ. ठाकूर यांनी मॅटच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
डॉ. ठाकूर यांचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्याचदरम्यान ललित पाटील ड्रग्ज प्रकरण समोर आले़ ससून रुग्णालयातील ललित पाटील याचा मुक्काम वाढविण्यासाठी डॉ. संजीव ठाकूर यांचा हात असल्याचे आरोप केले जात होते.
त्याबाबत शासनाच्या समितीने केलेल्या चौकशीत डॉ. ठाकूर यांना दोषी ठरवून त्यांना पदमुक्त केले होते. तरीही वैद्यकीय शिक्षण विभाग डॉ. काळे यांची नियुक्ती करत नव्हते. शेवटी बुधवारी रात्री उशिरा आदेश काढला गेला. डॉ. काळे हे आजपासून ससून अधिष्ठाता पदाची सुत्रे हाती घेतील.












