ऑनलाइन बँकिंग व्यवहार करणाऱ्या खातेदारांचे बँक खाते हॅक करून ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रकार समोर येत आहेत. अशीच एक घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे. सायबर चोरट्यानेएस.बी.आय. बँकेच्या औंध शाखेतील एका महिला खातेदाराच्या अकाऊंटमधून पाच लाख रुपयांची रोकड परस्पर काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.28) दुपारी अडीच च्या सुमारास रहाटणी येथे महिलेच्या राहत्या घरी ऑनलाईन पद्धतीने झाला. याबाबत रहाटणी येथे राहणाऱ्या महिलेने बुधवारी (दि.29) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुकर मिरधा व बँक खाते धारकावर आयपीसी 420 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेचे एस.बी.आय बँकेच्या औंध शाखेत खाते आहे. त्यांचे बँक खाते हॅक करुन आरोपीने परस्पर खात्यातून 5 लाख रुपये काढून घेतले. याबाबत माहिती मिळताच महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल जाधव करत आहेत.












