पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०१ : चाळीत झलेल्या भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ करत असताना समजावून सांगण्यासाठी गेलेल्या तिघांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चार जणांवर भोसरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार बुधवारी (दि.२९) रात्री साडे दहाच्या सुमारास दापोडी येथे घडला असून, याबाबत हरीसिंग लच्छी पांचाळ (वय-४३ रा. मयुर वाटीकेच्या पाठीमागे, दापोडी) यांनी (दि. ३० रोजी) भोसरी पोलीस स्टेशन मध्ये फिर्य़ाद दिली आहे.
यावरुन अजय शिंदे (वय-३२), २९ वर्षीय महिला आरोपी, आनंद गायकवाड (वय-३८), अशोक साळवी (वय-७० सर्व रा. आत्तार वीटभट्टी जवळ, दापोडी) यांच्यावर भा.दं.वी. कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फटाके फोडल्याच्या कारणावरुन आरोपी आणि फिर्यादी यांच्यात भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरुन आरोपी यांनी रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्य़ादी यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ केली. त्यावेळी आरोपींना समजवण्यासाठी फिर्यादी व त्यांची पत्नी गेले. त्यावेळी आरोपींनी त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी हरीसिंग पांचाळ यांच्या मुली मध्ये आल्या असता आनंद गायकवाड याने त्याठिकाणी पडलेली विट पांचाळ यांच्या मुलीच्या डोक्यात मारुन तिला जखमी केले. तर अजय शिंदे व महिला आरोपी यांनी पांचाळ यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.
तसेच आम्ही तुम्हाला सोडणार नाही, एक एकाला मारु टाकू अशी धमकी दिली. हरीसिंग पांचाळ यांच्या तक्रारीवरून सादर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.












