तब्बल तीन वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते.दोघेही छान नात्यात रमले असतांना अचानक तरुणीने बोलणे बंद केले. ‘ती’ बोलत का नाही? या विचाराने गोंधळलेल्या तरुणाच्या मनात शंका वाढली. तिने इतर कुणाशी जवळीक वाढवली याचा त्याला संशय आला. या नैराश्यातून एका १६ वर्षीय अल्पवयीन प्रियकराने टोकाचे पाऊल उचलले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी मुंढवा येथे राहणाऱ्या मुलाच्या आईने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती अशी की, तक्रारदार यांचा १६ वर्षाचा मुलगा हा एका विद्यालयात शिक्षण घेत होता. त्याचे एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. गेल्या तीन वर्षांपासून ते एकमेकांत गुंतले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तरुणी ही त्याच्याशी नीट बोलत नव्हती. त्याने थेट आजीचे घर गाठत गळफास घेऊन जीवन संवपले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ही घटना येरवडा परिसरात १ डिसेंबर रोजी घडली. पोलिसांनी या प्रकरणी १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे. जेव्हा तरुण तिला फोन करत असे तेव्हा त्याला टाळत मला तुझ्याशी बोलायचे नाही असे म्हणून ती त्याला टाळत होती. तिच्या या वागण्याने तो निराश झाला होता. त्याला तरुणीचे दुसऱ्या कुणाबरोबर संबंध असल्याचा संशय आला. यातून त्याने निराश होऊन १ डिसेंबर रोजी तो आजीच्या घरी गेला. यावेळी त्याने पुन्हा तरुणीला फोन करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांमध्ये मोठा वाद झाला. याचा मानसिक त्रास झाल्याने त्याने गळफास घेऊन टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले. पुढील तपास येरवडा पोलिस करत आहेत.












