पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०७ : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषेदेच्या वतीने १०० व्या ऐतिहासिक नाट्यसंमेलनासाठी, पिपरी चिंचवड शहराची निवड करण्यात आली आहे, असे अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले आहे.
या संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. जब्बार पटेल यांनी भूषविले तर मा. शरदचंद्र पवार साहेब हे संमेलनाचे स्वागत अध्यक्ष म्हणून लाभले. स्वागत समिती अध्यक्ष उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार हे होते. तर उद्योग मंत्री उदय सामंत हे संमेलनाचे प्रमुख निमंत्रक होते.
दिनांक ६ व ७ जानेवारी २०२४ या दोनही दिवशी शहरातील सर्व नाट्यगृहांमध्ये बहुरंगी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
प्रमुख संमेलन हे मोरया गोसावी क्रीडांगण, काकडे पार्क, चिंचवडगाव येथे पार पडले.संमेलनाची सुरुवात अत्यंत भव्य अशा नाट्यदिंडी व शोभा यात्रेने करण्यात आली. या नाट्यदिंडी मध्ये लोककलांचे सादरीकरण करणाऱ्या कलाकारांपासून ते नाट्य क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या नाट्यकलावंताचा सहभाग होता.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये असणाऱ्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, के. अंकुशराव लांडगे नाट्यगृह आणि त्याचबरोबर महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र मैदान, भोईर नगर, चिंचवड येथील मैदानावर बालरंगभूमी द्वारे बालनाट्य सादरीकरणासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच दोन दिवस संपन्न होणाऱ्या या नाट्य संमेलनामध्ये विविध व्यावसायिक नाटके, महाराष्ट्र राज्यस्तरीय हौशी मराठी नाट्य स्पर्धेत गाजलेल्या विविध नाट्य प्रयोग, प्रायोगिक नाटके, नाट्यछटा, एकपात्री प्रयोग, एकांकिका, कीर्तन, लोककला, महाराष्ट्रात गाजलेल्या विविध लावणी सम्राज्ञींचा लावणी महोत्सव, संगीत व नृत्य विषयक कार्यक्रम, बालनाट्य व संबंध महाराष्ट्रभरातील स्पर्धामध्ये नावाजलेल्या, उल्लेखनीय एकांकिका व नाटकांचे प्रयोग करण्यात येत आहेत.
पिंपरी चिंचवड मधील आबालवृद्ध रसिकांसाठी ही एक सांस्कृतिक पर्वणी असणार आहे.












