न्यायालयात प्रलंबित असलेल्या केसचा निकाल आपल्या बाजूने लागण्यासाठी व निकालपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी कोर्टातील क्लार्क यांना 50 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगून पहिला हप्ता 20 हजार रुपये स्वीकारताना सोलापुरातील एका वकिलास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
अॅड. दयानंद मल्लिकार्जुन माळी (रा. माळी वस्ती सोरेगाव, विजापूर रोड, सोलापूर) असे लाचखोर वकीलाचे नाव आहे. याबाबत 35 वर्षीय महिलेने सोलापूर एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने 7 डिसेंबर रोजी पडताळणी करुन सोमवारी सापळा रचून दयानंद माळी याला लाच घेताना रंगेहाथ पकडले.
महिला तक्रारदार यांच्याविरुद्ध सह. निबंधक, को ऑप सोसायटी, पुणे या न्यायालयात सावकारी अपील केसची सुनावणी सुरु आहे. केसचे निकाल तक्रारदार यांच्या बाजूने लावण्यासाठी व निका लपत्रासाठी सह निबंधक को ऑफ सोसायटी, पुणे येथील क्लार्क यांना 50 हजार द्यावे लागतील असे सांगून यातील तक्रारदाराचे वकील दयानंद माळी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी करत असल्याबाबत तक्रार सोलापूर एसीबी पथकाला प्राप्त झाली होती.
या तक्रारीची पडताळणी केली असता खासगी इसम वकील दयानंद माळी यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या विरोधात सह. निबंधक को ऑफ सोसायटी, पुणे यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या केसचा निकाल आपल्या बाजूने लागण्यासाठी व निकालपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी तेथील क्लार्क यांना 50 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगून पहिला हप्ता 20 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार सोनवणे, गजानन किनगी, रवी हाटखिळे,चालक राम सुरवसे यांच्या पथकाने केली.












