हॉटेलच्या स्वयंपाक घरातील अंडे चोरल्याच्या संशयावरून तेथील महिला कर्मचाऱ्याला कपडे उतरवण्यास भाग पाडून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील नामांकित हॉटेलमध्ये घडला आहे. येरवडा येथील हॉटेल पार्क ऑर्नेटच्या शेफने हॉटेलमधील ५० वर्षीय महिला कर्मचाऱ्यावर अंडी चोरल्याच्या कारणावरुन विनयभंग केला. हा प्रकार २६ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा येथे राहणाऱ्या ५० वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी पुन्डील हा पार्क ऑर्नेट या हॉटेल मध्ये शेफ म्हणून कार्यरत होता. तर पीडित महिला याच हॉटेलमध्ये कामाला आहे. मुकेश पुन्डील याने महिलेला तुम्ही वेळेवर ड्युटीवर येत नसल्याचे बोलून वाईट नजरेने पाहिले.
महिलेने त्याला त्यांचे ड्युटी रजिस्टर तपासण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने महिलेला अश्लील शिवीगाळ केली. यानंतर आरोपीने पीडित महिलेवर तू अंडे कुठे लपवून ठेवली आहेत, असे म्हणून तिची अंग झडती घेऊन तिला कपडे उतरवण्यास भाग पाडले.
तसेच महिलेचा रस्ता अडवून अश्लील शेरेबाजी करत नोकरी घालवण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. यावरुन हॉटेल मधील शेफ मुकेश सिंह पुन्डील (वय-३१ रा. हॉटेल पार्क ऑर्नेट, येरवडा) याच्यावर भा.दं.वि. कलम ३५४, ३५४अ, ३४१, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.












