अपघाताच्या गुन्ह्यातील गाडी तक्रारदाराला परत करण्यासाठी लाच घेणाऱ्या चिखली पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेत कारवाई केली.
नरेंद्र लक्ष्मण राजे (वय ५४) असे त्या सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदार यांच्या गाडीचा अपघात झालेला असून चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास नरेंद्र राजे करीत होते. या गुन्ह्यातील गाडी तक्रारदार यांना परत करण्यासाठी राजे यांनी त्यांच्याकडे दीड लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती एक लाख रुपये देण्याचे ठरले.
त्यापैकी १३ डिसेंबरला १५ हजार व १५ डिसेंबरला ५५ हजार रुपये राजे यांनी स्वीकारले. उर्वरित रकमेची मागणी केली असता तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर, उर्वरित रकमेपैकी वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी, चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.












