पुणे: गांजा, एम. डी, एल एस डी असे तीन वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ बाळगलेल्या तिघांना पुणे पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. या तिघांकडून पोलिसांनी १९ लाख ४५ हजार रुपयांचा ओजीकुश गांजा, एम डी आणि एल एस डी अंमली पदार्थ जप्त केले आहेत.
आर्श उदय व्यास (वय २५, रा. पंतनगर, घाटकोपर, मुंबई), अंशुल संतोष मिश्रा (वय २७, रा. सराफ लाईन, मिश्रा निवास, बुलढाणा), पियुश शरद इंगळे (वय २२, रा. चिखली, चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंमली पदार्थ विरोधी पथक सोमवारी गस्त घालत असताना पथकातील पोलीस अंमलदार संदिप शिर्के यांना त्यांच्या बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, नर्हे येथील भुमकर चौकात काही जण अंमली पदार्थ घेऊन येणार आहेत. त्यानुसार पोलीस पथकाने सादर ठिकाणी सापळा रचला. कृष्णा घोडनदीकर टॉवरजवळ तिघे जण संशयितरित्या फिरताना दिसले. पोलिसांनी तिघांना पकडले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे १७ लाख ४१ हजार रुपयांचा २५१ ग्रॅम वजनाचा ओजीकुश गांजा, १५ ग्रॅमचे एम ड व ६२ ग्रॅम चे एल एस डी असा अंमली पदार्थ व २ लाख ४ हजार रुपयांचा इतर ऐवज असा एकूण १९ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज मिळून आला. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासकामी या तिघांना सिंहगड रोड पोलिसांच्या त्याब्यात देण्यात आलं आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा,
अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार संदिप शिर्के, सचिन माळवे, विनायक साळवे, प्रविण उत्तेकर, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, सुजित वाडेकर, नुतन वारे, रेहाना शेख, विपुल गायकवाड यांनी केली आहे.