नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ताथवडे व मारुंजी येथील आठ आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) प्लॅन्टला नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, तर अवैधरित्या चालू असलेले सात प्लॅन्ट बंद करण्यात आले आहेत. या भागातील नागरिक व सामाजिक संघटनांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
ताथवडे, मारुंजी या भागातील प्रदूषणाची पातळी वाढत आहे. हवेची गुणवत्ता ढासळल्याने नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे, येथील रेडी मिक्स काँक्रीटच्या प्लॅन्टसाठी काही प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही नियम ठरवून दिलेले आहेत. त्यानुसार, प्लॅन्टला बाजूने कमीत कमी पाच फुटांपर्यंत कुंपण घालणे, धुळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाणी मारणे हे त्यातील काही नियम आहेत.
मात्र, अनेक व्यावसायिकांकडून या नियमांचे उल्लंघन झाल्याचे मंडळाने केलेल्या पाहणीत दिसून आले. त्यामुळे, जोपर्यंत सर्व नियमांची पूर्तता होत नाही; तोपर्यंत हे प्लॅन्ट पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.