पुणे : ससून रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी ३१ डिसेंबरला केलेल्या मद्य पार्टीची छायाचित्रे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे दाखवून वाभाडे काढले होते. मद्य पार्टीप्रकरणी १० ते १२ निवासी डॉक्टरांचे सहामाही सत्र पुढे ढकलण्याची शिफारस वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने केली आहे. याप्रकरणी कारवाई करण्यास रुग्णालय प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
ससूनमध्ये काही निवासी डॉक्टरांनी ३१ डिसेंबरला मद्य पिऊन गोंधळ घातला होता. त्यात अस्थिव्यंगोपचार विभागातील काही निवासी डॉक्टरांचा समावेश होता. या डॉक्टरांनी मद्य पिऊन शेजारील निवासी महिला डॉक्टरांच्या खोलीच्या दरवाजाची काच फोडली होती. याप्रकरणी एका निवासी महिला डॉक्टरने तक्रार केली होती. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने १ जानेवारीला नेत्रविकार विभागाच्या प्रमुख डॉ. संजीवनी आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नेमली. समितीने चौकशी करून अहवाल अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्यासमोर सादर केला होता.
अहवाल सादर केल्यानंतर त्याबाबत काही प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे आधीचा चौकशी अहवाल तपासून कारवाई करण्याबाबत अहवाल सादर करण्यासाठी उपसमिती नेमण्यात आली होती. या उपसमितीने सादर केलेला अहवाल वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे सादर करण्यात आला होता. यावर १० ते १२ निवासी डॉक्टरांचे सहामाही सत्र पुढे ढकलण्याची शिफारस संचालनालयाने केली. मात्र, महाविद्यालय प्रशासनाने अद्यापपर्यंत कारवाई करणे टाळले आहे. यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगूनही प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे उघड झाले आहे.
अधिष्ठात्यांचे मौन
मद्य पार्टी प्रकरणातील दोषी निवासी डॉक्टरांवर कारवाईबाबत विचारले असता ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी मौन धारण केले. वैद्यकीय शिक्षण संचालनालयालाच याबाबत विचारा, अशी भूमिकाही त्यांनी घेतली. या प्रकरणातील निवासी डॉक्टरांवर अद्याप कारवाई झाली नाही, याला मार्डच्या पदाधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला.