बारामती लोकसभा मतदारसंघात काल मतदान पार पडले. पण मतदानाच्या पूर्वसंध्येला बारामती मतदारसंघात अनेक बेकायदेशीर गोष्टी घडल्याचे समोर आले आहे. शिवाय, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटाकडून मतदारांना पैसे वाटप होत असल्याचे व्हिडिओ तसेच वेल्हा येथील पीडीसी बँक रात्री बारानंतर सुरू असल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. याची दखल प्रशासनाने तातडीने घेतली. तसेच निवडणूक आयोगाने पीडीसी बँक वेल्हा शाखेवर कारवाई केली आहे.
पीडीसी बँकेची वेल्हे शाखा रात्री बारानंतर सुद्धा सुरु ठेवल्याने बँक व्यवस्थापक विनायक तेलावडे याच्याविरुध्द आदेशाचा भंग केल्याप्रकरणी (भादंवि १८८) नुसार गुन्हा दाखल केला आहे याबाबतची फिर्याद निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाचे प्रमुख रमेश अजिनाथ बेलेकर (३५, रा. नसरापूर, ता. भोर. जि. पुणे) यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश बेलेकर वेल्ह्यात कृषी सहायक आहेत. त्यांची निवडणूक आयोगाकडून वेल्हे तालुक्यात भरारी पथकाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भरारी पथकातील बेलेकर, तुषार तडवी आणि सहकारी सोमवारी पहाटे चारच्या सुमारास गस्त घालत होते. रोहित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वेल्हे शाखा रात्री बारानंतर सुरू असल्याची माहिती समाजमाध्यमातून दिली. त्यानंतर भरारी पथक तेथे पोहोचले.
भरारी पथकाने घटनास्थळी येऊन पाहणी असता बँक व्यवस्थापकांच्या दालनाच्या बाहेर ४० ते ५० जण थांबले होते. त्यानंतर भरारी पथकाने बँक व्यवस्थापक तेलावडे यांच्याशी संपर्क साधला. बँकेतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्याची मागणी भरारी पथकाने केली.
बँकेचे विभागीय अधिकारी प्रकाश गायकवाड यांनी सीसीटीव्ही चित्रीकरण
तपासण्याची परवानगी दिल्यानंतर सीसीटीव्ही चित्रीकरणात ४० ते ५० जण बँकेत आढळून आले. बँकेची वेळ संपल्यानंतर मध्यरात्रीनंतर बँक सुरू ठेवली, तसेच आदेशाचा भंग केल्याप्रकरणी बंँक व्यवस्थापक तेलावडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा अजित पवार यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.