पुणे : अबकी बार मोदी सरकार…अबकी बार श्रीरंग बारणे खासदार अशी स्वतःच म्हणण्याची वेळ खासदार बारणेंवर आली आहे. पिंपरीमध्ये आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या जाहीर सभेत आठवले यांच्या समोर मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंनी भाषण करत ‘अबकी बार मोदी सरकार, अबकी बार श्रीरंग बारने खासदार’ अशी घोषणा केली. यावेळी त्यांच्या घोषणेला विशेष असा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे चर्चला उधाण आले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे हे मावळ लोकसभा निवडणूक लढवत आहेत. २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभेच्या वेळी बारणे यांनी बलाढ्य अशा उमेदवारांना पराभूत केलं होतं. यावेळी मात्र चित्र उलट आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांचं बारणे यांच्यासमोर आव्हान असणार आहे. बारणे यांच्या प्रचारासाठी आज पिंपरीत सभा घेण्यात आली. यावेळी रामदास आठवले यांनी या सभेला संबोधित केलं.
त्याआधी श्रीरंग बारणे यांचं भाषण झालं. ही निवडणूक नात्यागोत्याची नसून देश कुणाच्या हातात द्यायचा यासाठी असल्याचे मत बारणे यांनी व्यक्त केलं. विरोधक माझ्याबद्दल गैरसमज पसरवत आहेत, असं देखील त्यांनी म्हटले आहे. याच दरम्यान श्रीरंग बारणे यांनी ‘अबकी बार मोदी सरकार.. अबकी बार श्रीरंग बारणे खासदार’ असं म्हणत स्वतःचीच पाठ थोपटून घेतली. यामुळे सभेदरम्यान बारणेंच्या या घोषणेची जोरदार चर्चा सुरू आहे.