अमरावती लोकसभेच्या नवनीत राणा यांच्यासाठी भाजपा नेते अमित शाह यांची प्रचारसभा आज होत आहे. या सभेच्या जागेवरून नवनीत राणा आणि बच्चू कडूंमध्ये मोठा वाद काल झाला होता. आता अजित पवारांच्या पक्षाचे नेते आणि नवनीत राणांमध्ये जुंपली आहे. राणा यांच्या सभा मंडपावरील बॅनरवर अजित पवारांचा फोटो गायब झाला आहे. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी केलेली पोस्ट रिट्विट करत पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी पवार गटाची खिल्ली उडवली आहे.
याबाबत आमदार अमोल मिटकरी यांनी राणा यांच्या प्रचार सभेच्या मंडपाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये मिटकरी यांनी इशारा दिला आहे की, त्यांनी मोठी किंमत मोजावी लागेल.
अमित शाह यांच्या सभेसाठी लावलेल्या या बॅनरलवर एका बाजुला नरेंद्र मोदी आणि राणा यांचा फोटो आहे. तर दुसऱ्या बाजुला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अमित शाह यांचा फोटो आहे. परंतु या अख्ख्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो नाही.
याबाबत केलेली पोस्ट मिटकरी यांनी नवनीत राणा यांना टॅग केली आहे. मिटकरी यांनी म्हटले आहे की, राणा या महायुतीचा धर्म विसरल्या आहेत. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा निवडणुकीत याची मोठी किंमत मोजावी लागेल.
मिटकरी यांचे ही एक्सवरील पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी रिट्विट केली असून यावर लिहिले आहे की, असं नाही… नीट रडायचं! मोठमोठ्याने टाचा रगडून रडायचं, तरच बोनस मिळेल.