आढळरावांसाठी प्रचार करणारे म्हणाले होते, नेता हवा की अभिनेता? पण माझा साधा प्रश्न आहे, नेत्याच्या रुपात स्वतःच्या कंपनीचे उखळ पांढरे करणारा उद्योगपती हवा की, सर्वसामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा लोकप्रतिनिधी हवा? हा खरा प्रश्न आहे, असे म्हणत शिरुरचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच शिवाजी आढळराव पाटलांना देखील कोल्हे यांनी आव्हान दिले आहे.
आज शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मॅरेथॉन सभा होणार आहेत. या सभांपूर्वीच अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर निशाणा साधत आढळरांवा आव्हान दिले आहे. आता अजित पवार आणि आढळराव कोणते प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यासाठी अमोल कोल्हे यांनी एक व्हिडिओ शेअर केला असून यात म्हटले आहे की, आता शिवाजीदादा या प्रश्नाचे उत्तर देणार का? त्यांनी जे आव्हान दिले होते, ते स्विकारुन निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडणार का? आणि जे नेते शिवाजीराव आढळरावांसाठी मते मागायला येणार? त्यांना या गोष्टीची कल्पना आहे का? असे प्रश्न कोल्हे यांनी विचारले आहेत.
आढळराव लोकसभेच्या निवडणुकीतून बाहेर पडण्याचा शब्द पाळणार का? याची आठवण कोल्हेंनी आढळरावांना आजच्या सभांप्रसंगी करून दिली आहे. यासाठी आढळरावांच्या डायनालॉग कंपनीचा आणखी एक पुरावा त्यांनी व्हिडीओमध्ये सादर केला आहे. २९ एप्रिल २०१६रोजी आढळरावांनी विचारलेल्या प्रश्नाचा मुद्दा आता कोल्हेनी छेडला आहे.
हा प्रश्न ही संरक्षण विभागाशी संबंधित असल्याचा आणि यातून आढळरावांनी स्वतःच्या कंपनीचे हित साधल्याचा दावा कोल्हेनी केला आहे. पहिल्या पुराव्याचा आणि माझ्या कंपनीचा संबंध नाही असे आढळराव म्हणाले होते. त्यानंतर कोल्हेनी दुसरा पुरावा दिला आहे, आता आढळरावांनी निवडणुकीतून बाहेर पडण्याचा शब्द पाळावा, असे कोल्हे यांनी आव्हान दिले आहे.