पुणे: राज्यभरात उन्हाची तीव्रता वाढल्याने एकीकडे उष्माघाताच्या संकटापासून वाचण्यासाठी सरकारने अलर्ट दिला असताना आता अवकाळी पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या सहा ते नऊ एप्रिलदरम्यान राज्यात गारपिटीसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारपासून राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होताना दिसणार आहे.
भारतीय हवामान खात्याने राज्यात सहा एप्रिलपासून अवकाळीच्या संकटाची शक्यता वर्तवली आहे. पाच एप्रिलपासूनच राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळण्याऐवजी त्यात वाढ होऊ शकते. भारतीय हवामान खात्याने म्हटले होते की, यावर्षी उन्हाची तीव्रता भारतात एप्रिल ते जून या कालावधीत सरासरीपेक्षा जास्त राहील.
त्यानुसार महाराष्ट्रात तापमानात झालेली वाढ सध्या जाणवत आहे.
राज्यातील सर्वाधिक तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेली आहे.
असे असताना आता सहा ते नऊ एप्रिलदरम्यान राज्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक भागात दोन दिवसांपासून सकाळी ढगाळ वातावरण आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस तर काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.