पिंपरी : झपाट्याने विस्तारत असलेल्या वाकड, थेरगाव, ताथवडे, पुनावळे, चऱ्होली, मोशी, डुडुळगाव या उपनगरांमध्ये पाणी समस्या गंभीर झाली आहे. बोअरवेल आटल्याने गृहनिर्माण संस्थेतील सभासदांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अपुरा, तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात मोठी घट झाल्याने शहरात पाणीटंचाई भासत असून पाच दिवसांपासून समाविष्ट गावे तहानलेलीच आहेत.
गेल्या चार वर्षांपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्याने पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये दहा महिने घट होते. मात्र, एप्रिल-मे सुरू होताच त्यामध्ये वाढ होते. त्यातच इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधाऱ्याला गळती लागली असून, आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात घट झाली आहे. तीन ते चार दिवसांपासून तर अवघे २१ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी शहरासाठी मिळाले. सुमारे ५९ एमएलडी पाण्याची तूट निर्माण झाल्याने समाविष्ट गावांसह उपनगरांमध्ये पाणी समस्या भीषण झाली आहे. सुरळीत व मुबलक पाणी देण्यात महापालिका अपयशी ठरत असल्याने प्रशासनावर अवलंबून न राहता वाकड, ताथवडे, पुनावळे, थेरगाव, चऱ्होली, मोशी, डुडुळगावातील रहिवाशांनी बोअरवेलचा आधार घेतला; मात्र, उन्हाळ्यात बोअरवेल आटतात. काहींचे पाणी कमी होते. पालिकेचे पाणीदेखील कमी दाबाने येते. त्यामुळे एप्रिल महिना सुरू होताच या भागातील नागरिकांची पाण्याअभावी होरपळ सुरू असल्याचे चित्र आहे. उन्हाळ्यात टँकरच्या पाण्यावर लाखो रुपये खर्चून तहान भागवावी लागते.