आईला भेटायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक
कोट्यवधी रुपयांच्या मेफेड्रोन तस्करी प्रकरणातील फरार आरोपीला गुन्हे शाखेने कोंढवा भागातून अटक केली आहे. त्याच्याकडून दहा लाख रुपये किमतीचे ५१ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. आरोपी मागील एक महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता. तो कोंढव्यात राहणाऱ्या आईला भेटायला येणार असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
शोएब सईद शेख असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो गेल्या एक महिन्यापासून फरार होता. चौकशीत तो फरार काळात जळगाव, पंढरपूर, शिर्डी अशा ठिकाणी फिरत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, तो हैदर शेख याच्यासोबत माल पुरवणे आणि गोडाउनमध्ये ठेवणे तेथून पुढे पाठवणे अशी कामे करत होता. न्यायालयाने आरोपीला २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मेफेड्रोन तस्करीचा प्रकार उघडकीस आणला. विश्रांतवाडी,
कुरकुंभ औद्योगिक वसाहत, दिल्ली तसेच सांगली शहरात छापे टाकून पोलिसांनी ३७०० कोटी रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला. एमडी तस्करीचा मुख्य सुत्रधार संदीप धुनिया, अशोक मंडल, वीरेंद्रसिंह बसोया फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणात आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर शोएब शेख पसार झाला होता.
शोएब शेख आईला भेटण्यासाठी कोंढवा भागात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शोएबला अटक केली. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनखाली सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, सुनील तांबे आणि पथकाने केली.