पिंपरी: शिक्षणाबरोबरच मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे असून महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या नवोदित मतदारांनी २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीसाठी मतदान करुन आपला मतदानाचा महत्त्वपूर्ण हक्क तर बजवावाच शिवाय प्रत्येकाने किमान १०० मतदारांना देखील मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडायचे आहे. राज्याच्या तसेच देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही सक्षम करण्यासाठी नवोदित मतदारांचे मतदान महत्त्वाचे आहे प्रतिपादन प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे यांनी केले.
२०६, पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदार कार्यालयाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप उपक्रमांतर्गत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालय येथे मतदान जनजागृतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख, स्वीपचे नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, दिव्यांग कक्षाचे नोडल अधिकारी शरद पाटील, सहाय्यक नोडल अधिकारी बालाजी गिते, स्वीप विभागाचे महालिंग मुळे,संदीप सोनवणे, राजेंद्र कानगुडे, दिनेश जगताप, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी डॉ.सारिका मोहोळ, डॉ.मधुकर राठोड, वैभव साळवे आणि महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते यामध्ये १० अंध विद्यार्थ्यांचाही समावेश होता.
यावेळी विद्यार्थ्यांनी “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू.” अशी शपथ घेऊन १०० टक्के मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.
प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालयामध्ये कला, विज्ञान, वाणिज्य आणि संगणक विभागातील सुमारे ६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यामध्ये ४,८९० विद्यार्थी मतदार आहेत.